डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हयात समाज कल्याणतर्फे 10 दिवस कार्यक्रम

 
s

उस्मानाबाद -सर्वांना समान न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.या अंतर्गत आजपासून सलग दहा दिवस (06 ते 16 एप्रिल 2022) राज्यासह उस्मानाबाद जिल्हयामध्ये "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम" आयोजित करण्यात येणार आहेत.यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास सामाजिक न्याय विभागातर्फ अभिवादन करण्यात येणार आहे.

विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी आणि देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त, बार्टीचे महासंचालक तसेच मुंबई शहराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदींचा समावेश करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे आज सामाजिक समता कार्यक्रमाचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. 07 एप्रिल रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 08 एप्रिल रोजी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  येथील सामाजिक न्याय भवनामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनिट्रॅक्टर आदी योजनेच्या लाभार्थांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात येईल. 09 एप्रिल रोजी, सामाजिक न्याय भवन  येथे ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावा, आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

         10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत  जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांची माहिती देऊन जनतेचे प्रबोधन करण्यात येईल.11 एप्रिल रोजी, कृषी महाविद्यालय, गडपाटी, आळणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 एप्रिल रोजी, समता दुतामार्फत जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मार्जिन मनी कार्यक्रमाची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

          13 एप्रिल रोजी, उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये अनु.जाती व नवबौध्द घटकातील वस्तीमध्ये समता दुतांमार्फत संविधान जनजागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  14 एप्रिल, उस्मानाबाद जिल्हयातील स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात येणार आहे. त्याठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रांचे ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात येईल.

          15 एप्रिल, रोजी  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद येथे महिला मेळावा आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारा कार्यक्रम घेतला जाईल. तसेच तृतीयपंथासाठी जनजागृती कार्यक्रम घेऊन त्यांची नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.आणि 16 एप्रिल या अंतिम दिवशी, उस्मानाबाद शहरातील अनु.जाती व नवबौध्द घटकातील वस्तीमध्ये जाऊन स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल,असे सहायक आयुक्त श्री.अरावत यांनी कळविले आहे.


 
 

From around the web