रस्ता सुरक्षा हा सर्वांच्या कर्तव्य, जबाबदारीचा अविभाज्य भाग
 

 
रस्ता सुरक्षा हा सर्वांच्या कर्तव्य, जबाबदारीचा अविभाज्य भाग

 रस्ता वाहतुकीशी आपला संबंधच येत नाही, अशी व्यक्ती असूच शकत नाही.  कारण रस्ता वाहतूक हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.  शाळा, दवाखाना, बाजार, यात्रा, मित्र परिवार, पाहुणे आदींच्या सहज किंवा सुख दु:ख कारणाने भेटी तसेच नोकरी, व्यवसाय, रोजगार आदी कारणास्तव प्रत्येकाला प्रसंगानुरुप का होईना रस्त्यावरुन वाहतूक अर्थात येणे-जाणे करावेच लागते.  त्यामुळे रस्ता सुरक्षा संबंधाने माझी काहीच जबाबदारी नाही किंवा मला काही देणे घेणे नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही.  जिवंत माणसाचे तर सोडाच पण प्रेताचाही रस्ता वाहतुकीशी संबंध येतो.  त्यामुळे आपणा सर्वांना आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता सुरक्षा अभियानाचा एक भाग बनावे लागणार आहे.

रस्ता सुरक्षा अभियानाचा भाग बनण्यासाठी आपण नेमके काय करु शकतो, मला नेमके काय करावे लागणार आहे,  हे ज्याने त्याने ठरवणे आवश्यक आहे.  कारण याकामी प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य सारखेच असेल असे नाही. या अभियानाचा भाग बनण्याच्या अनुषंगाने काही प्रमाणात इतरांपेक्षा आपल्या कर्तव्य, जबाबदारीत फरक असू शकतो.  जसे वाहन चालकाने वाहन चालविताना घ्यावयाच्या काळजीचे नियम पाळणे,  रस्त्याची डागडुजी करणाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करणे, आवश्यक ते सूचना फलक लावणे, पादचारी लोकांनी डाव्या बाजूने, रस्त्याच्या कडेने चालण्याचे नियम पाळणे,  विद्युत विभागाने वाहतूकीला अडथळा होतील असे खांब काढून टाकणे, लोंबकळत्या तारा व्यवस्थित करणे, नागरिकांनी रस्त्यावर जनावरे बसू न देणे, वाहन बंद पडले तर ते तत्काळ कडेला लावणे, तेथे वाहन बंद पडल्याची स्पष्ट दिसेल अशी सूचना लावणे, चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसू न देणे, चालत्या वाहनावर लोंबकळत किंवा वाहनाच्या टपावर प्रवाशांना बसू न देणे, वेळेवर वाहनांची दुरुस्ती देखभाल करणे, मद्यप्राशन करुन वाहन न चालवणे, पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना चोहीकडे व्यवस्थित पाहून रस्ता ओलांडणे, रस्त्याच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, रस्त्यावर कचरा, दगड, गोटे, झाडांच्या फांद्या, प्लास्टीक व वाहतूकीस अडथळा होईल असे काहीही न टाकणे, रस्त्याला लागून किंवा रस्त्यावर वाहन उभे न करणे, प्रवाशांनी वाहन चालकास वेगात वाहन चालवण्यासाठी प्रेरित न करणे, वाहन चालक नियमाचे पालन करीत नसेल तर त्यास नियमाचे पालन करण्यास भाग पाडणे, अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या त्या वेळी आपण ज्या भूमिकेत आहोत त्या भूमिकेतून आपण पाळल्या पाहिजेत.

रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने मी एकट्याने नियम पाळले नाहीत तर काय होणार आहे ? असे कोणीही म्हणू नये कारण एखाद्याचे दुर्लक्ष, एखाद्याची चूक त्याच्या बरोबर इतरांवर संकट येण्यास कारणीभूत होऊ शकते.  कोणाच्या का दुर्लक्षामुळे किंवा चुकीमुळे होईना पण एखाद्यावरही प्राण गमावण्याचे, एखादा अवयव गमावण्याचे संकट आले तर ते संकट एकापुरते मर्यादीत नसते.  त्या संकटाचा भावनिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक विपरीत परिणाम काही अंशी का होईना त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांवर, त्याच्या मित्र परिवारावर, नातेवाईकांवर होत असतो.  खरे म्हणजे कोणीही व्यक्ती एकटा नसतो.  त्याच्या ज्यांच्याशी कौटुंबिक, सामाजिक किंवा अन्य प्रकारचा संबंध असतो, त्यांचा आपलेशी काही अधिकारात्मक, जबाबदारीत्मक संबंध येत असतो.  त्यामुळे मी एकट्याने रस्ता सुरक्षा पाळली नाही तर काय होणार ? असा चुकीचा विचार कोणीही करु नये.  आपण प्रत्येक जण समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे आपली वैयक्तिक जबाबदारी तसेच सामाजिक जबाबदारी आहे,  याचे भान ठेवून आपण रस्त्यावरुन वाहन चालवताना ये-जा करताना सर्व प्रकारे काळजी घेण्याचा, आवश्यकतेनुसार इतरांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करुन रस्ता सुरक्षा अबाधीत राहील यासाठी प्रयत्न करायला हवा.  आपल्या छोट्याशा प्रयत्नाने एक अपघात जरी कमी झाला किंवा अपघात टळला तरी आपण खूप मिळवले व चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले असे म्हणता येईल.

-    डॉ.विजयकुमार फड , मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद 

                                                                                    

                                                                        

From around the web