उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांची संघर्षमय कहाणी...

 
उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांची संघर्षमय कहाणी...

प्रशिक्षणानंतर वर्धा येथे उपजिल्हाधिकारी पदावर जॉईन झालेले आकाश अवतारे  यांची कहाणी संघर्षमय आहे. आकाश अवतारे हे उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील मूळ रहिवासी. त्यांचे शिक्षण उस्मानाबादेत झाले असून, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुण्यात केला आहे. पुण्यात त्यांच्या सोबत अभ्यास केलेल्या राहुल शिंदे यांनीच आकाश अवतारे यांची ही  संघर्षमय कहाणी  लिहिली आहे.



    घरची परिस्थिती जेमतेम.. वडील  बारावी शिकलेले,आईचं शिक्षण दहावीपर्यंत झाल, वडील  कपडे शिवण्याचे काम करत,तर आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी.. दुसऱ्याच्या शेतात राबराब राबायचे. परिस्थिती हालाकीची असल्याने, सतत पडणारा मराठवाड्यातील दुष्काळ, यामुळे बरबडा गवताच्या बियापासून भाकरी करून खाल्ल्या असल्याचे आकाश यांचे वडील सांगतात. गावातील काही मित्रांच्या संगत गुणांमुळे वडील मोठय़ाप्रमाणात दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले, आता सर्वच संपणार,  मुला-बाळाच कसं होणार? संसाराच काय होणार? पाहिलेली सर्वच स्वप्ने अगदी उध्वस्त होणार. हे प्रश्न आकाश यांच्या आई समोर उभे होते. परंतू सुदैवाने वडील लवकरच या व्यसनातून सावरले तेंव्हा पासून  ते आज पर्यंत ते कोणतेच व्यसन करत नाहीत. अहोरात्र काम करून वडिलांनी शिकविण्याचा उचललेला विडा.. अशा हलाकीच्या  कौटुंबिक परिस्थितीतून उस्मानाबाद  तालुक्यातील समुद्रवाणी येथील आकाश आवतारे यांनी शिक्षण घेतले. घरची जेमतेम परिस्थिती असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नव्हताच. तसेच भौगोलिक परिस्थितीही त्याचप्रकारची असल्यामुळे शिक्षणाला मोठ्या शहरात जाणे अशक्यच. आधार होता फक्त चुलत्यांचा.

आकाश  यांची शिक्षणाची सुरुवात समुद्रवाणी गावातील जिल्हा परिषद शाळेतून  झाली. घरातील वातावरण सुशिक्षित असल्यामुळे वडील मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असतं. खऱ्या अर्थानें मुलांचा बेसिक पाया वडिलांनी घरीच मजबूत केला होता. लासोना येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. घर ते शाळा हे अंतर दीड-दोन किलोमीटरचे पायी प्रवास करावा लागत होता, त्यानंतरचे शिक्षण अकरावी व बारावी  श्रीपतराव भोसले कॉलेज उस्मानाबाद येथे झाले. अकरावीला प्रवेश कला शाखेत घेतला व आपला टर्निंग पॉईंट इथे चुकला, असे वाटल्याने नंतर दोन महिन्यानंतर अकरावी सायन्सला शिक्षकांना विनंती करून प्रवेश घेतला. 2008 साली बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनीअरिंग करण्याचा निर्णय घेतला परंतू सीईटी मध्ये मार्क कमी मिळाले, नंबर लागला नाही. पूर्ण वर्षभर लातूर येथे मित्रासोबत रूम करून अभ्यास केला. मित्राची देखील परिस्थिती जेमतेम. या ठिकाणी जेवणाचे, राहण्याचे अगदी हाल होते. एक वेळेचा डबा व रात्री भात किंवा वडापाव खाऊन रहावे लागत होते.  2009 साली सीईटीला मार्क चांगले मिळाले शासकीय अभियांत्रिकी कॉलेज कराड येथे प्रवेश मिळाला. कालांतराने आय. टी. क्षेत्रात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आकाश पुणे येथे येऊन खासगी आय.टी. कंपनीत नोकरी करू लागले.भाऊ म.न.पा.शिक्षक सूरज व आई- वडिलांनसोबत चर्चा करून फक्त दोन महिने  नोकरी करून त्या ठिकाणचा राजीनामा दिला आणि सवारी वळवली स्पर्धा परीक्षांकडे, भावाच्या मार्गदर्शनाने आणि मित्रांच्या साथीने व तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर कोणत्याही क्लासला न जाता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपणास जिल्हाधिकारी  व्हायचे, असे स्वप्न असल्याचे घरात आकाश बोलून दाखवित असे. तेच स्वप्न त्यांनी  "उपजिल्हाधिकारी" पद मिळवून  साक्षात खरे करून दाखविले आहे.

आकाश आई-वडिलांचे कष्ट वारंवार पाहत होते. त्यांना  वाटायचे आपली आई शेतात काम करते. तीचे कष्ट वाया जावू द्यायचे नाही. नातेवाईकांनी मदत मागितल्यावर फिरवलेली पाठ, आधार तेवढा चुलत्यांचा होता. तेदेखील खेड शिवापूर येथे दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून मजुरी करत. त्यांनी शिक्षणाला दिलेले पैसे कारणी लावायचे, कोणत्याही परिस्थितीत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे, हे ध्येय आकाश यांनी मनाशी बाळगले व आपणास अधिकारी बनून प्रशासनात जायचेच हे ठरवले. भाऊ सूरज यांना, अभ्यासात हुशार असून देखील कौटुंबिक परिस्थितीमुळे मनाप्रमाणे शिक्षण घेता आले नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डी.एड करून शिक्षकांची नोकरी करावी लागली व आपल्या भावाच्या आकाश यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा लागला. स्वतःचे स्वप्न आकाश यांच्या रूपात पाहू लागले. आकाश यांनी  यू.पी.एस.सी. ची तयारी 2014 पासून सुरू केली, सन 2016 व 2017 मध्ये पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा देखील दिल्या, परंतू यशाने हुलकावनी दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यू.पी.एस.सी च्या अभ्यासावरच 2017 मध्ये राज्यसेवा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला व पहिल्या प्रयत्नात पूर्व, मुख्य, मुलाखत झाली व पोस्ट अगदी 10 मार्कने गेली. त्यांची प्रगल्भ  इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती आलेल्या अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने व जिद्दीने अभ्यास चालूच ठेवला. अभ्यास ऐके अभ्यास करीत ते आपल्या स्वप्नपूर्तीकडे आगेकूच करीत होते. 

ही संधी त्यांना 2018 मध्ये मिळाली. या संधीचे सोने करायचे त्याने ठरविले. 2018 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून  राज्यातून दुसरा क्रमांक घेऊन आकाश यांनी आपल्या घवघवीत यशाचा ठसा उमटविला. उस्मानाबाद  तालुक्यातील समुद्रवाणीसारख्या गावातून या शेतमजुर पुत्राने गावात आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे.त्यांच्या  निवडीची वार्ता गावात कळताच त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.

सप्टेंबर 2019 यशदा पुणे येथे प्रशिक्षण सुरू झाले एवढ्यावरच न थांबता आपले पुढील ध्येय आय.ए.एस अधिकारी होण्याचं ते समोर ठेऊन अजूनही अभ्यास चालूच आहे.

या यशामुळे त्यांच्या आई वडिलांना झालेला आनंद आकाशात मावेनासा झाला आहे. आई-वडील व मोठा भाऊ सूरज  यांच्या पाठींब्यामुळेच मला यश हे मिळाले आहे, असे ते बोलून दाखवितात. मोठा भाऊ असलेल्या सूरजने त्यांना नेहमी पाठिंबा दिला. अपयश आल्यास खचून न जाता जोमाने कामाला लागणे, निराशावादी न राहणे हे सर्व सूरजमुळे आकाश यांना जमले. मोठा भाऊ त्यांचा पाठीराखा झाला. त्यांच्या या यशामध्ये कुटुंबियांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी  स्पर्धा परीक्षांसाठी कोणतेही क्लासेस लावले नाहीत. त्यांनी  मनाशी बांधलेली खुणगाठ व ध्येय पूर्तीसाठी केलेल्या अथक परिश्रमाने आकाश यांना हे यश प्राप्त झाले आहे.. सध्या ते वर्धा जिल्हा येथे मार्च 2020 पासून "उपजिल्हाधिकारी" या पदावर कार्यरत आहेत.

त्यांना पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी व "जिल्हाधिकारी" पदाच्या स्वप्नपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा.

✍️ राहूल शिंदे,उस्मानाबाद

From around the web