कोरोना : पुन्हा खेड्याकडे चला !

 
कोरोना : पुन्हा खेड्याकडे चला !


अवघं जग कोरोना (कोविड  - १९) नावाच्या एका "क्षुद्र" विषाणूच्या दहशतीखाली वावरत आहे. या विषाणूच्या प्रकोपामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. मानवजातीच्या अस्तित्वालाच सुरुंग लागल्याने सर्व शक्यता, क्षमता, परिणाम आणि  शेवट  याचा शोध घेण्यासाठी आपापल्या परीने धडपडताना दिसताहेत.

पृथ्वीतलावरील निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संसाधने हे प्रयोगशाळा समजून वेगवेगळ्या उंचीपर्यंत झेप घेत  जगातील प्रत्येक जण अंतिम टोकापर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील  दिसतो. नव्हे तर शेकडो शोधकार्यामध्ये अंतिम निष्कर्षापर्यंत आलेला मानव आज  कोरोनापुढे मात्र हतबल झालेला असून या विषाणूचे  क्षालन  करण्यासाठी महत्प्रयास करीत आहे .

आज  त्याला ठळकपणे यश आलेले नसले तरी आशादायक पावले पडत असताना कुठेतरी बुडत्याला काडीचा आधार वाटतो हेही तेवढेच खरेआहे. बेसुमार  शहरीकरण आणि उद्योगांचे केंद्रीकरण झाल्यानेच आज झालेल्या नुकसानीचा आकडा फुगीर दिसत आहे. अर्थात उद्योगांच्या शहरीकरणाला आणि उद्योग धंदे तिथेच थाटण्याला संसाधनांची उपलब्धता हा निकष प्राधान्यक्रमामुळे हि स्थिती झाली असावी असेच म्हणावे लागेल. अर्थकारण,राजकारण, समाजकारण  या स्तरावर विचार करता समाजकारणाचा विचार करून जीवन सुरक्षित  करणे हेच प्रत्येकाचे उद्दिष्ट बनले आहे.

          आज  उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा विचार करता कालपरत्वे या विषाणूची व्याप्ती क्षतिग्रस्त झाल्यानंतर शहरे उपलब्ध स्ट्रक्चर वर पुन्हा वाटचाल सुरळीत करतील व पुन्हा नव्याने उभारी घेतीलही पण ग्रामीण जीवनावर याचा दूरगामी असा विपरीत परिणाम झाला आहे. तो कसा सुसह्य होईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटते.

         ग्रामीण भागातील जनता आपले घरदार, शेती, गुरेढोरे, मजुरी इतक्या मर्यादित विश्वात राहत होती. लहान वयातच थोडीफार शिकलेली  मुलं -मुली काम धंद्यासाठी शहराकडे वळली होती. अपेक्षा गरजा कमी असल्याने " ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान" या ओवी प्रमाणे अत्यंत चौकटबद्ध जीवनाची लक्ष्मण रेखा  आखून जीवन जगत होती. आता पुन्हा सर्व तरुण मुलाबाळांनी गावाकडची वाट धरल्याने तेथील चित्र अधिकच भयावह झाले आहे. बेकारीची  दाहकता  आता ग्रामीण व्यवस्थेवर गंभीर परिणाम करेल अशी शक्यता गृहीत धरून आता पुन्हा खेड्याकडे चला ! असा नारा देऊन पुनःश्च हरी ओम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

       वैद्यक शास्त्रातील अनेक उपचार पद्धतीतून कोणत्याही उपचाराने या विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करून मानवाने आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे . वृध्दापकाळाकडे झुकलेली ,असाध्य , दुर्धर आजाराने असलेल्याना या विषाणूने सर्वप्रथम आपले लक्ष केले असल्याने  आयुष्याच्या संध्याकाळी किलकिल्या नजरेने मुलाबाळांचे संसार  , नातवंडांचे चाळे पाहत आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष पाहण्यासाठी आसुसलेल्या डोळ्यांना आसऱ्यासाठी वणवण, पोटाची परवड, मुक्या जीवांची तडफड हताशपणे पाहण्याची दुर्दैवी वेळ अनेक जेष्ठ नागरिक आणि  माताभगिनींवर यावी यासारखा दैवदुर्विलास  तो कोणता?

       अशा या गंभीर परिस्थितीत ग्रहतारे , पापपुण्य , धर्म अधर्म  यासारख्या विषयावर अनावश्यक चर्चा घडताना दिसत आहेत . याविषयाना ग्रामीण बळी तर पडणार नाही ना ? याचाही विचार  होणे आवश्यक आहे.

       बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित शास्त्रीय निकषाला अनुसरून चर्चा, विचारमंथने घडवून तज्ज्ञांच्या साहाय्याने या समस्येवर मत  करणे शक्य होईल. संकट अतिशय गंभीर आहे यात तिळमात्र शंका नाही. पण असाध्य आहे असे मानायला जग सहासहजी तयार होणार नाही हेही सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यामुळे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे हेच अंतिम सत्य मानून  मानव संहार करणाऱ्या या विषाणूचा खातमा करण्यासाठी सर्व  तज्ज्ञमंडळी अहोरात्र परिश्रम घेताहेत. त्यांच्या या प्रयत्नाला लवकरात लवकर यश येईल आणि पुन्हा आपण सर्वसंपन्न होऊ  हाच आशावाद !

श्री. मुकेश माणिकराव औटे.
अणदूर , ता. - तुळजापूर

From around the web