प्रा.राजन शिंदे यांची हत्या : कोण चुकले ?

 
s

औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख आणि चर्मकार समाजाचे नेते असलेल्या प्रा.राजन शिंदे यांची हत्या त्यांच्याच मुलाने केल्याचे निष्पन्न झाल्याने सगळे औरंगाबाद शहर सुन्न झाले.आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला फार फार तर तीन वर्षांची शिक्षा,ती देखील बालसुधारगृहात राहून भोगावी लागेल.शहराला हादरवून टाकणाऱ्या या हत्या प्रकरणाचा अत्यंत कसोशीने आणि शक्य तेवढ्या लवकर छडा लावल्या बद्दल औरंगाबाद पोलिसांचे अभिनंदन करावे लागेल.परंतु आई-वडील दोघेही प्रोफेसर असलेल्या सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबातील अवघ्या १७ वर्ष ८ महिने वयाचा अल्पवयीन मुलगा अत्यंत थंड डोक्याने,नियोजनपूर्वक आणि अत्यंत निर्घृणपणे स्वतःच्या जन्मदात्या पित्याची हत्या करतो हे धक्कादायक तितकेच चिंताजनक आहे.

एखाद्या उलट्या काळजाच्या मुडदेफरास गुन्हेगाराप्रमाणे कर्दनकाळालाही भीतीने कंप सुटावा इतके भीषण कृत्य तो एवढासा पोर करूच कसा काय धजावला ? या घटनेतील आरोपी पकडला असला,हत्येसाठी वापरलेली हत्यारे सापडली असली,आरोपीने खुनाची कबुली दिली असली तरी अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.खुनी मुलगा आपला बाप हिटलरचा अवतार होता,तो कायम आपणास 'ढ' म्हणून हिणवायचा.वेळोवेळी पाणउतारा करायचा.म्हणून एकदाचा संपवला असे म्हणाला.पण त्याच्या जवाबावर पूर्ण विसंबून न राहता पोलीस तपास अजून सुरु आहे.हत्येचे नेमके कारण काय ? काय घडले हे माहित असूनही घरातील इतर सदस्य (आरोपीचे आई व बहीण) आरोपी पकडला जाईपर्यंत इतके शांत व धीरगंभीर कसे काय होते ? याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.

आरोपी अनेक दिवसांपासून गुन्हेगारी वेब सिरीज,युट्युब आणि सिनेमे पहात होता.हत्या कशी करावी,शरीराच्या कुठल्या भागावर आघात करावा,अल्पवयीन गुन्हेगाराला किती शिक्षा होते.बाल सुधारगृह म्हणजे काय ? तिथे काय सोयी सुविधा मिळतात.या बाबतची देखील इत्यंभूत माहिती आरोपीने गुगल सर्च करून मिळवली होती.पहाटे दोनच्या सुमारास गाढ झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर त्याने व्यायामाच्या डंबेल्सने पाच प्रहार केले.तेवढ्याने त्याचे समाधान झाले नाही म्हणून चाकूने गळा आणि हाताच्या नसा कापल्या.हत्येचे दुष्कृत्य केल्यानंतरही  अत्यंत सराईतपणे त्याने हत्यारांची विल्हेवाट लावली.पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.पुन्हा साळसूदपणे ऍम्ब्युलन्स आणायला गेला.बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात घटनेची खबर द्यायला गेला.इतकेच नाही तर इतक्या कमी वेळेत त्याने घरातील अन्य सदस्यांना गप्प बसण्यास प्रतिबद्ध केले.

पोलिसांच्या तपासाला भरकटवण्याचाही त्याने प्रयत्न केला.अशा स्थितीत या आरोपीला तो केवळ चार महिन्यांसाठी अल्पवयीन ठरतो म्हणून त्याला विधिसंघर्षग्रस्त दर्जा द्यावा काय ? हा ही प्रश्न आहे.दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातही एका आरोपीला अल्पवयीन असल्याचा फायदा मिळाला होता.इतर आरोपीना फाशी तर त्याला फक्त तीन वर्षांची शिक्षा झाली.तीही त्याला बाल सुधारगृहात भोगावी लागली,वास्तविक निर्भयावर सर्वाधिक अमानुष अत्याचार करणारा आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लोखंडी रॉड घुसवणारा गुन्हेगार तो अल्पवयीनच होता.वरील प्रकरणातही आरोपी अल्पवयीन आहे म्हणून त्याला शिक्षेच्या प्रकारात आणि कालावधीत मोठी सूट मिळू शकते.

खरे तर आता,ज्या प्रमाणे मतदानाच्या अधिकाराचे वय २१ वरून १८ वर आणले आहे तसेच अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त म्हणून शिक्षेत सूट देण्याच्या वयाची मर्यादा १४ वर्षावर आणणे गरजेचे आहे.अल्पवयीन मुले देखील अविश्वसनीय अशी पराकोटीची पाशवी दुष्कृत्ये करताना मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की नव्या पिढीची विचार करण्याची,परिस्थितीला हाताळण्याची पद्धत भिन्न आहे.त्यांची मानसिकता वेगळी आहे.जीवनविषयक दृष्टिकोन वेगळा आहे.हल्लीची मुले टोकाची भावविवश आहेत.त्यांच्यात संयम आणि सहनशीलता नाही.सभोतालचे वातावरण आणि ते जे ऐकतात पहातात ते जग त्यांच्या भावनिक निकोप वाढीला पोषक नाही.ही स्थिती आहे खरी.

आजकाल कुटुंबातला सुसंवाद राहोच, संवाद देखील हरवला आहे.यात गरीब श्रीमंत असा भेद नाही.केवळ दारिद्र्य,अभाव आणि गरिबीत जगणारी झोपड्पट्टीतली मुलेच वाईट वळणाला जातात,व्यसनी,दुर्वर्तनी,गुन्हेगार बनतात असे काही नाही.उच्चभ्रू लब्ध प्रतिष्ठित समाजातील पैशांची आणि सेवा सुविधांची ददात नसलेल्या घरातली मुलेही व्यसनी,जुगारी बनत आहेत.गुन्हे करीत आहेत.औरंगाबाद मध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेतील मुलगा देखील सुखवस्तू कुटुंबातला होता.हे सगळे वैभव आपल्या आई -वडिलांमुळेच आहे याचीही त्याला जाण-जाणीव असणार.एकुलता एक मुलगा म्हणून तो वडिलांसकट सर्वांचा लाडकाही असणार.त्याला पाहिजे ते हवे तितके मिळत असणार.असे असताना केवळ वडील करड्या शिस्तीचे होते.चुकांवर पांघरून न घालता उघडपणे खडे बोल सुनावत होते,म्हणून ते थेट हिटलर,आणि हा कोण ? 

ब्रिटनचा पंतप्रधान विस्टन चर्चिल की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष  हॅरी ट्रुमन ? होय  हॅरी ट्रुमनच ! त्यानेच तरया पृथ्वीतलावरील मानवतेला कायमचा काळिमा फासणारे-हिरोशिमा नागासाकी केले.जगाला अजूनही उमजलेले नाही की अखिल मानवजातीला कलंकित करणाऱ्या त्या घटनेत कोण चुकीचे होते ? इथेही काय वेगळे आहे ? मेलेला बाप आणि मारणारा मुलगा यात नेमके चुकले कोण ?  
 
रवींद्र तहकीक
संपादक लोकपत्र

From around the web