जनतेच्या रेट्यामुळे नांदेड- पनवेल - नांदेड रेल्वे पूर्ववत सुरु 

लातूर, उस्मानाबादचे रेल्वे प्रवासी मात्र मूग गिळून गप्प 
 

उस्मानाबाद  :  दौंड-कुर्डुवाडी विभागातील भाळवणी ते वाशिंबे रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचे २६.३३ किलोमीटर दुहेरी लाइन सुरू करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेने हा मेगाब्लॉक घोषित केला आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. यामुळे उस्मानबादमार्गे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या तिन्ही  रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

उस्मानाबादहून पुणे , मुंबईकडे धावणाऱ्या आणि येणाऱ्या नांदेड – पनवेल – नांदेड , हैदराबाद – हडपसर - हैदराबाद, बिदर - मुंबई- बिदर ( लातूर एक्स्प्रेस ) या तिन्ही गाड्या  तब्बल १४ दिवस म्हणजे २८ ऑक्टोबरपर्यंत त्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र नांदेडच्या जनतेने आंदोलन केल्यानंतर नांदेड - पवनेल -नांदेड ही रेल्वे मार्ग बदलून सुरु करण्यात आली आहे. 

यापूर्वीचे वृत्त  रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांच्या खिशाला कात्री ...

रेल्वे विभागाने म्हटले आहे की, या कार्यालानाने दिनांक ९ ऑक्टोबर रोजी प्रेस नोट क्र. ७५ नुसार गाडी संख्या ०७६१४  नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस दिनांक १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान आणि गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस दिनांक १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचे कळविले होते.

परंतु जनतेची मागणी लक्षात घेवून हि गाडी रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे ने बदलला आहे. आत्ता दिनांक १४ ऑक्टोबर ते २८  ऑक्टोबर दरम्यान हि गाडी पूर्वी प्रमाणेच परंतु बदलेल्या मार्गाने धावेल. ती पुढील प्रमाणे --

1)  गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच नांदेड येथून सुटेल, परंतु दिनांक १४ ऑक्टोबर ते २७  ऑक्टोबर दरम्यान हि गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच लातूर रोड, कुर्डूवाडी , मिरज, पुणे या मार्गाने धावेल.

 
2)   गाडी संख्या ०७६१३ पवनेल ते नांदेड  एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच पनवेल येथून सुटेल. परंतु दिनांक १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान हि गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच पुणे, मिरज, कुर्डूवाडी, लातूर रोड या मार्गाने धावेल.

नांदेडच्या जनतेच्या रेट्यामुळे नांदेड - पवनेल -नांदेड रेल्वे जशी सुरु झाली तशा  हैदराबाद – हडपसर - हैदराबाद, बिदर - मुंबई- बिदर ( लातूर एक्स्प्रेस ) या दोन रेल्वे गाड्याही मार्ग बदलून का सुरु होत नाहीत ? असा सवाल आहे. 

 लॉकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरे आता कुठे सुरु झाली आहे.  त्यामुळे लोक बाहेर पडले आहेत. तसेच  दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे. लातूर, उस्मानाबाद भागातील जनतेने अथवा केल्यास नांदेड प्रमाणे दोन्ही गाड्याही सुरु होतील , असा कयास बांधला जात आहे.