फरीद शेख मारहाण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरु 

 

उस्मानाबाद -  फरीद शेख ( वय २६, रा. समर्थनगर )  मारहाण प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि अन्य पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली असून, चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी दिले आहे. 

शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फरीद शेख ( वय २६, रा. समर्थनगर )  हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचा चालक पठाण आले आणि त्यांनी  टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली 

यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने ' तुला साहेब दिसत नाहीत का ? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे असे म्हणून अश्लील शिवीगाळ सुरु केली. 

यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले. 

आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक चव्हाण,  मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी फरीद शेख  यास लाथाबुक्यांनी आणि बेल्स्टने डोक्यावर आणि हातापायावर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली होती. 

उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिसांचा तालिबानी कारभार ( Video )

याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने सर्वप्रथम आवाज उठवून फरीद शेख यास न्याय देण्याची मागणी केली होती. फरीद शेख यानेही आपल्या जबाबमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगितले. 

त्यानंतर पोलीस निरीक्षक चव्हाण आणि अन्य पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी दिले.