डिग्गीतील अवैध धंद्याविरुद्ध महिलांनी रणशिंग फुंकले

उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर पोलिसांची छापेमारी  

 

उमरगा -  सीमावर्ती भागात असलेल्या डिग्गी  गावात हातभट्टीची दारू आणि शिंदी विक्री खुलेआम सुरु आहे.त्याविरुद्ध गावातील महिला एकत्र येऊन रणशिंग फुंकल्यानंतर उमरगा पोलीस खडबडून जागे झाले असून, त्यांनी काही ठिकाणी छापेमारी करून दहा लोकांना अटक केली आहे. 

डिग्गी हे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव असून, या गावात मुबलक प्रमाणात हातभट्टीची दारू आणि शिंदी विक्री सुरु आहे.उमरगा पोलिसांच्या आशीर्वादामुळे  आठ ठिकाणी हातभट्टी दारू आणि दोन ठिकाणी शिंदी विक्री सुरु आहे. या प्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने आवाज उठवताच, उमरगा पोलीस अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या तरुणांना दमबाजी केली होती. तसे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने प्रसिद्ध केले होते. 

अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या तरुणांना पोलिसांची दमबाजी

त्यानंतर गावातील महिला आणि तरुण एकत्र येवून  हातभट्टीची दारूआणि शिंदी विक्री करणाऱ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर उमरगा पोलीस खडबडून जागे झाले. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. 

 डिग्गी गावात यापुढे एकही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. दारु, शिंदी, मटका, जुगार व गुटखा बंद करुन गाव व्यसनमुक्त करु,असे आश्वासन पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी यावेळी दिले. या कामासाठी गावातील महीला व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी  सरपंच संतोष कवठे, माजी उपसरपंच वामन गायकवाड, रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला, प्रविण स्वामी आदी उपस्थित होते. 

दोन वर्षापुर्वी गावातील महिलांनी थेट दारु दुकानात जाऊन दुकानातील दारू नष्ट केली होती व गावातील शंभर महिलांनी जिल्हाधिकारी  व पोलिस अधिक्षकांना भेटून निवेदन दिले होते. 


अवैध धंद्यावर छापेमारी

दरम्यान,महिलांनी आवाज उठवल्यानंतर  डिग्गी येथील हातभट्टी आणि शिंदी विक्री ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करून दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून भादंवि  ६५ (ई), ८१,८३ मप्रोका, ६५ (फ), ८१ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.