लाचखोर नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी 

 

धाराशिव - शहरातील रेशन दुकानदाराकडून दरमहा हप्ता वसुली करणाऱ्या नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांना एसीबीने गुरुवारी अटक केली आहे. आज ( शुक्रवारी ) न्यायालयात उभे करण्यात आले असता त्यांना  चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.  ११ सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे. 

धाराशिवच्या सर्किट हाऊसमध्ये ओली पार्टी केली म्हणून  केलूरकर यांची उमरगा तहसील कार्यालयात निवडणूक विभागात उचलबांगडी करण्यात आली असली तरी  केलूरकर यांचे धाराशिवमधील  अनेक प्रताप समोर येत आहेत. 

धाराशिवमध्ये पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार असताना केलूरकर यांनी रेशन दुकानदार नागेश जगदाळे यांच्याकडे १९ मे व ४ सप्टेंबर रोजी ९ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. मात्र त्यांना संशय आल्याने ती स्वीकारली नाही. परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेल्या कॉल रेकॉर्ड आणि व्हिडीओमध्ये  त्यांनी लाच मागितल्याचे पुरावे असल्याने एसीबीने त्यांना गुरुवारी अटक केली आहे. 

आज ( शुक्रवारी ) केलूरकर यांना न्यायालयात उभे करण्यात करण्यात आले असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी  सुनावण्यात आली आहे.   ११ सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे. 

धाराशिव  शहरात एकूण  ३५ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शहर आणि तालुका मिळून २११ स्वस्त धान्य  दुकानदार  आहेत. त्यांच्याकडून किमान दरमहा तीन हजार रुपये हप्ता घेतला जात होता.  त्याचे एकूण कलेक्शन सहा लाख ३३ हजार होत होते. त्याचे वाटेकरी ठरलेले आहेत.वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यात गुंतलेले आहेत.धाराशिव लाइव्हने लाच गोळा केल्याचा पुरावा सादर केला होता. 

असा केला जातो काळाबाजार

गोरगरीब शिधापत्रिका धारकांना दरमहा गहू, तांदुळ, साखर, डाळ वाटप करण्यासाठी  प्रत्येक दुकानदारांना  कोटा दिला जातो, मात्र एकाद्याच्या नावावर १५ किलो धान्य असेल तर दहा किलोच दिले जाते. प्रिंटर खराब असल्याचे कारण सांगून पावती दिली जात नाही. तसेच दुकान कधी उघडले जाते तर कधी नाही अशी परिस्थिती असते. धान्य अजून आले नाही म्हणून नेहमी परत पाठवले जाते. 

तुम्ही तिकडे काळाबाजार करा, आम्हाला दरमहा तीन हजार रुपये हप्ता द्या, असा अलिखित आदेशच असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार निर्ढावले आहेत.  कलेक्शन करण्यासाठी पुरवठा अधिकऱ्यांनी  काही दलाल नेमले आहेत.हे दलाल ठराविक तारखेला हप्ता गोळा करून अव्वल कारकूनाच्या हाती देत आहेत, तेथून वरिष्ठ अधिकाऱ्याना  ठरलेला हप्ता जात आहे.  आलेला हप्ता तहसील कार्यालयातच मोजला जात आहे, हे विशेष. 

तहसीलच्या पुरवठा अधिकाऱ्यांची वसुली जोरात ( व्हिडीओ )

ओली पार्टी प्रकरणी ठपका 

धाराशिवच्या  सर्कीट हाऊसमध्ये बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी  रात्री नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर  यांनी  स्वस्त धान्य दुकानदारांसोबत ओली पार्टी केली होती, याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशीअंती केलूरकर  यांच्यावर 'ठपका' ठेवला असून, तशी नोंद मूळ सेवा पुस्तिकेत घेण्याचे आदेश दिले आहेत. ओली पार्टीचे प्रकरण देखील धाराशिव लाइव्हने उघडकीस आणले होते.