धक्कादायक : कळंब तालुक्यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
May 14, 2020, 21:23 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता चांगलाच शिरकाव केला आहे. कळंब तालुक्यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता चार झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
कळंब तालुक्यातील पाथर्डी गावातील दाम्पत्यासह कळंब शहरातील महसूल विभागाच्या एका कर्मचाऱ्यास बाधा झाल्याची माहिती आहे. या तिन्ही जणांचे स्वॅब नमुने बुधवारी (ता. १३) सायंकाळी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी (ता. १४) सायंकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. यापैकी पाथर्डीतील दाम्पत्य हे मुंबईवरुन परतल्याची माहिती आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच महसुल विभागाच्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागन झाल्याची माहिती आहे. पाथर्डी येथील पती - पत्नी चे वय अनुक्रमे ३८ आणि ३३ आहे तर महसूल कर्मचाऱ्याचे वय ३४ आहे.
मुंबईहून आलेल्या पाथर्डी येथील पती पत्नीला शेतात होम क्वारंटाईन आले होते, त्यामुळे त्यांच्या संपर्कात कमी लोक आले होते मात्र महसूल कर्मचाऱ्याच्या संपर्कात अनेकजण आल्याचे समजते.
उस्मानाबाद जिल्हा ऑरेंज झोन मध्ये
उस्मानाबाद जिल्हा तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये होता. परंडा तालुक्यातील सरणवाडी गावातील एक टेम्पो चालक ११ मे रोजी कोरोना पॉजिटीव्ह आढळला होता. त्यानंतर आज कळंब तालुक्यातील तीन रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने एकूण संख्या चार झाली असून आता हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आला आहे.
हे नक्की वाचा
चिंता वाढली, काळजी घ्या !