कोण चुकतंय ? मॅडम की आपण ?

 

आता कोरोनाबरोबर चालावे लागेल !


जगभर आणि देशभर हाहाकार उडवणारा कोरोना विषाणू उस्मानाबाद जिल्ह्यात थांबला आहे. मागे दिल्ली आणि मुंबई वारी करून आलेले तीन रुग्ण सोडले तर या जिल्ह्यात कोरोना बाधित एकही रुग्ण सापडलेला नाही. त्या तीन रुग्णांना तात्काळ बरे करण्यात आरोग्य विभागाला यश आले, गेल्या एक महिन्यात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही, हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे.


दुसरीकडे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे अर्थचक्र बिघडले आहे. शेतकरी आणि  व्यापारी आणि त्यांच्यावर  अवलंबून असलेल्या सर्व लोकांचे  मोठे नुकसान झाले आहे तर सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. आता सर्व व्यवहार, दुकाने हळू हळू सुरु झाले पाहिजेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे गरज आहे. परंतु जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांना नेमके काय आदेश काढावेत हे सुचेनासे झाले आहे.

सुरुवातीला सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली, नंतर काही तासात हा निर्णय बदल करण्यात आला आणि आठवड्यातील तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार बुधवारी सकाळी बाजारपेठ सुरू होताच रस्त्यांवर प्रचंड गर्दी होऊन रस्ते जाम झाले. परिणामी सोशल  डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.


बुधवारी बाजारपेठ उघडण्याचा दिवस असल्याने सकाळपासूनच नागरिक रस्त्यांवर दिसू लागले. नागरिकांच्या गर्दीने आणि वाहनांमुळे बाजारपेठेतील रस्तेही जाम झाले. मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकासह काळा मारुती परिसर, ताजमहल चित्रपटगृह, नेहरू चौक, भाजी मंडई,समता नगर आदी भागात रस्त्यांवर प्रचंड गर्दी उसळली होती.

दुकानांमध्येही नागरिकांची खरेदीसाठी झुंबड  उडाली तर वाहनांच्या गर्दीने रस्ते जाम झाले. वाहनांच्या हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांची बैचेनी झाली. दुकानांसमोर, बँका-पेट्रोल पंप, भाजीच्या दुकानांसमोर सोशल  डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. प्रचंड गर्दी आणि  नियमांची होत असलेली पायमल्ली यामुळे लॉक डाऊनमधील ही सवलत नागरिकांना महागात पडू शकते, अशी भीती यानिमित्ताने व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांनी शिस्तीचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार कारवायांना सुरुवात केली आहे. मात्र, कारवायातून हे थांबणार नाही तर स्वयंशिस्त आवश्यक आहे.सुसाट निघालेली ही गाडी थांबण्याची गरज आहे.

आठवड्यातून केवळ तीनच दिवस मुभा देण्यात आल्याने ही गर्दी उसळली, त्याकरिता आठवड्यातील सर्व दिवस दुकाने उघडे ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.  खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी जनभावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी असलेल्या मॅडमची भेट घेतली, परंतु मॅडम आपल्या निर्णयावर ठाम आहेत, यामुळे पुन्हा उद्या शुक्रवारी हेच चित्र पहावयास मिळणार आहे.

सीमेवर कडक पहारा ठेवा 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, परंतु शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या  १५० च्या पुढे गेली आहे.त्याकरिता सोलापूर, लातूर,औरंगाबाद , कर्नाटक सीमा भाग आदी  पर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व रस्त्याच्या सीमा पूर्णतः सील झाल्या पाहिजेत, पोलीस दल आतमध्ये जी एनर्जी वेस्ट करीत आहेत, ती एनर्जी सीमा सील ठिकाणी घालवली पाहिजे.सीमेवर कडक पहारा ठेवला पाहिजे.  काही अधिकारी आणि पोलीस यांनी पुणे, औरंगाबाद , लातूर, सोलापूर वारी केल्याचे समोर आले आहे. हे अधिकारी आणि पोलीस सीमा सील असताना जिल्ह्यात येतात आणि जातात  कसे ?  सीमा पूर्ण सील पॅक केल्यास उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु करण्यास काय हरकत आहे ?


आता कोरोनाबरोबर चालावे लागेल !

कोरोना विषाणू देशभरातून हद्दपार होण्यास किमान ६ महिने ते एक वर्ष लागू शकतात, त्यामुळे सर्व व्यवहार बंद करून चालणार नाही. व्यवहार ठप्प झाल्यामुळे अर्थचक्र रुतून बसले आहे. त्याला रुळावर आणावे लागेल. लॉकडाऊनमुळे ज्यांची हातावर पोट आहेत ते मजूर उपासीपोटी  जीवन जगत आहेत. सर्वात जास्त हाल मध्यमवर्गीयांचे सुरु आहेत, त्यांना रांगेत उभे राहून मदतीचे किट मागता येत नाहीत आणि इकडे घरात सर्व किराणा संपला आहे. त्यांची अवस्था सांगता येईना आणि सहन होईना अशी झाली आहे.

कोरोना लवकर हद्दपार होणार नाही, ही शक्यता गृहीत धरून प्रत्येकाने स्वतःच्या  आरोग्याची काळजी घेत , बाहेर पडताना तोंडावर मास्क लावून, सोशल  डिस्टन्सिंग पाळून आता कोरोनाबरोबर प्रत्येकाला चालावे लागेल ! तरच बिघडलेले अर्थंचक्र रुळावर येईल.

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
9420477111