चला, आता कायम कोरोना मुक्त राहू या !

 


उस्मानाबाद जिल्ह्यातील तिन्ही कोरोना बाधित रुग्णांचा पहिला आणि दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. याचे सारे श्रेय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे तसेच  सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांचे आहे. त्याचबरोबर  शासन,प्रशासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस, लोक प्रतिनिधी यांनी एकजूट होऊन जे काम केले त्याचे हे फलित आहे. जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त होण्यास मदत झाली.

जगात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यात मुंबई, पुणे आदी शहरात  कोरोनाने अनेक बळी घेतले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण निघाले होते. पैकी दोन दिल्लीहून आणि एक मुंबईहुन आला होता. एक रुग्ण बलसूर, एक रुग्ण उमरगा आणि एक रुग्ण धानोरीचा होता. दोन रुग्ण उमरगा आणि एक रुग्ण लोहारा तालुक्यातील. या दोन्ही तालुक्यात  कोरोना पाय पसरत असताना जिल्हाधिकारी   दीपा मुधोळ - मुंडे यांनी काही कडक पाऊले उचलली. काही गावे सील करण्यात आली. लॉकडाऊन असताना अनेक वेळा जनता कर्फ्यू करण्यात आला.  लॉकडाऊन असताना जनता कर्फ्यू कश्यासाठी ? असे बालिश प्रश्न काही लोकांना पडले होते.  लॉकडाऊन असताना काही लोक बाहेर पडत होते, त्यामुळे मॅडमने जनता कर्फ्यू हा उपाय शोधला.

जिल्हाधिकारी बरोबर पोलिसांनी देखील चांगले काम केले. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई केली. दुकाने उघडे ठेवणे, रस्त्यावर विनाकारण फिरणे, मास्क न वापरणे यावर वेळोवेळी कारवाई केली. त्यामुळे मोकाट सुटणाऱ्या लोकांना आळा बसला. अनेक लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत असताना काही लोक ते पाळत नव्हते, अश्याना पोलीसानी अधून मधून काठीचा प्रसाद देत वठणीवर आणले. काही लोक प्रतिनिधींनी सकारात्मक कामे केली. मीडियाने सकारात्मक बातम्या दिल्या, उस्मानाबाद लाइव्हने प्रशासनाचे निर्णय लोकांना वेळोवेळो कळवले. काही वेळा प्रशासन चुकले तर त्याचा खरपूस समाचार घेतला. यातून  उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त होण्यास मदत झाली.

 उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त झाला म्हणून आता जास्त नाचू नका. शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात  अनेक दिवस एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. आता एकदम 21 रुग्ण निघाले आहेत. ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळू या. सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहू या. कामाशिवाय बाहेर पडायचे नाही.  अर्जंट कामासाठी बाहेर पडले तर  तोंडावर आणि नाकावर नेहमी मास्क आणि रुमाल बांधा. हात नेहमी धुवा. असेच कायम कोरोना मुक्त राहू या...

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
९४२०४७७१११