आश्चर्य आणि भय : वाशीजवळ पडला आकाशातून सोनेरी दगड 

 

वाशी : वाशी गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता प्रभू निवृत्ती माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर आकाशातून एक दगड पडला. तो अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता.  दरम्यान, हा दगड उल्का आणि की अशनी हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

  माळी यांनी शेतात भाजीपाल्याचे पीक घेतले आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांच्या वाफ्यात पाणी साचले आहे का, हे पाहण्यासाठी ते आज सकाळी शेतात गेले होते. वाफ्याची पाहणी करताना अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला. काही कळायच्या आतच माळी उभे असलेल्या जागेपासून आठ फूटांवर आकाशातून दोन किलो ३८ ग्रॅम वजनाचा सोनेरी दगड पडला.

यात माळी थोडक्यात बचावले. पण, अचानक घडलेल्या या घटनेमुळे ते भयभीत झाले होते. त्यांनी तहसीलदार नरसिंग जाधव यांना माहिती दिली. तहसील कार्यालयात अव्वल कारकून सचिन पाटील यांच्याकडे दगड जमा केला. तलाठी अशोक राठोड यांनी पंचनामा करून माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या उस्मानाबाद येथील कार्यालयाला दिली.


असा आहे हा दगड 

  •  ७ इंच लांबी, सहा इंच रुंदी.
  •  ३.५ इंचापेक्षा अधिक जाडी.
  •  २ किलो ३८ ग्रॅम अश्नीचे वजन

हा उल्कापातच, मात्र घाबरण्याचे कारण नाही

प्रथमदर्शनी हा उल्कापातच आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही. काही उल्का जमिनीवर येईपर्यंत जळून राख होतात. काही अर्धे जळालेले राहतात. हा त्यातला एक असू शकतो. दोन दिवसांत याची शहानिशा होईल. 
-बी. एम. ठाकूर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक