उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत नागदे - मोदाणी पॅनल विजयी 

सुधीर पाटील पॅनलचा धुव्वा 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे  नागदे - मोदाणी  पॅनलचे सर्वच्या सर्व  १४ उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. विरोधी सुधीर पाटील पॅनलचा धुव्वा उडवत नागदे - मोदाणी पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. 

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यामध्ये शाखा असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या १४ संचालकासाठी प्रथमच निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यासह इतर जिल्हे व राज्यातील ३२ हजार ५७६  मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ पासून ५० टेबलवर सुरू झाली असून दुपारी २ वाजता पहिली फेरी मतमोजणी संपली. 

या मतमोजणीत सत्ताधारी नागदे -मोदाणी -शिंदे पॅनलच्या उस्मानाबाद तालुका गटातून विश्वास शिंदे, वसंतराव नागदे, आशिष मोदाणी, उर्वरित उस्मानाबाद जिल्हा गटात तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपूरकर, प्रदीप पाटील, उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेरील महाराष्ट्र गटात वैजिनाथ शिंदे, निवृत्ती भोसले, सुभाष धनूरे, महाराष्ट्र बाहेरील गटात नंदकूमार नागदे, महिला गटात पंकजा पाटील, करूणा पाटील, मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती गटातून राजीव पाटील या उमेदवारांना पहिल्या फेरीत ८ हजार ३०० तर दुसऱ्या फेरीत १८ हजार ६०० मते मिळाली असून या पॅनलने १५ हजार मताची आघाडी घेतली होती. 

 विरोधी भाजपा प्रणीत परिवर्तन पॅनलच्या भाजप पुरस्कृत व अपक्ष उमेदवार  उस्मानाबाद तालुका गट सुधीर पाटील, विनोद गपाट, पिराजी मंजुळे मोहित उस्मानाबाद जिल्हा गट विकास कोंडेकर व सिद्धेश्वर पाटील तर महादेव लोकरे, उस्मानाबाद जिल्हा बाहेरील महाराष्ट्र गट अभिषेक आकनगिरे, दिलीप देशमुख, नितीन कवठेकर, नरोद्दीन काझी, महाराष्ट्र बाहेरील गट सीताराम जाधव, आर्थिक दुर्बल गट पांडुरंग धोंगडे, अनुसूचित जाती गट यशवंत पेठे, महिला गट सुचिता काकडे, सरिता शिंदे या उमेदवारांना पहिल्या फेरीत ११५०  व दुसऱ्या फेरीअखेर २६०० मते मिळाली.  सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना १७ हजार ४०० मते मिळाली आहेत.