महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणार नाही - आ.रोहीत पवार 

 

धाराशिव- सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पुन्हा पूर्ववत व्हावी, सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेली भूमिका, महाराष्ट्रधर्म टिकला पाहिजे हा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचा संदेश घेऊन राष्ट्रवादीची फौज पुन्हा मैदानात उतरली आहे. देशातील राजकारणाची पातळी खालावली असली तरी महाराष्ट्रात आपल्याला फुले, शाहु, आंबेडकरांचा विचार जपायचा आहे. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.

देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांचा संदेश घेऊन आ.रोहीत पवार यांनी महाराष्ट्र दौरा काढला आहे. या दौर्‍याची सुरुवात रविवारी (दि.13) तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका आणि सद्यस्थितीबाबत भाष्य केले. आ.पवार म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडे सध्या आर्थिक आणि दबावतंत्राची ताकद आहे. म्हणून लोकांच्या हितासाठी लढण्यासाठी आम्ही काम करत असताना आमच्यावरही कारवाई होऊ शकते. कितीही आघात झाले तरी आपण जनतेसाठी लढणे ठरविलेच असेल तर ते लढावेच लागते. ही शिकवण खा.शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. म्हणून महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठी अस्मिता टिकवण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडून त्या पक्षात दोन गट निर्माण केले. ज्या विचारांनी कुटुंब फोडले, ज्या विचारांनी पक्ष फोडला तेच लोक आज महाराष्ट्र फोडण्याचा विचार भारतीय जनता पार्टी करीत आहे. खा.शरद पवार साहेबांना साठ वर्षांचा राजकीय अनुभव आहे. राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या लोकांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल असेही आ. रोहीत पवार म्हणाले. यासोबतच गेल्या चार वर्षातील घडामोडी आणि सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत त्यांनी परखड मत व्यक्त केले.

यावेळी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, नितीन बागल, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, शहराध्यक्ष आयाज शेख, राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी धाराशिव जिल्हा दौर्‍यास सकाळी आ. रोहीतदादा पवार यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सुरुवात केली. त्यानंतर धाराशिव येथील राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर रायगड फंक्शन हॉल येथे कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेससह विविध सेलचे पदाधिकारी, उपस्थित होते.