रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभात पालकमंत्री डॉ.सावंत यांना डावलले !
धाराशिव- अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकाचा 25 हजार कोटी खर्चून पुनर्विकास होणार आहे, त्यात महाराष्ट्रातील धाराशिव ( उस्मानाबाद ) सह 44 स्थानकाचा समावेश आहे.
या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून करण्यात आली, तथापि धाराशिव ( उस्मानाबाद ) रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या कोनशिलावर पालकमंत्री तानाजी सावंत यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धाराशिव येथील रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना डावलल्याच्या घटनेने शिवसैनिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे स्थानक नूतनीकरणाच्या कोनशिलेवर पालकमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख न केल्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग करणार्या रेल्वे प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केली आहे.
धाराशिव येथील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. रविवारी (दि.6) देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नूतनीकरणाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. परंतु राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे नाव कोनशिलेवर नसल्यामुळे शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नेत्याला डावलून हा कार्यक्रम आयोजित करून रेल्वे प्रशासनाकडून दुजाभावाची वागणूक दिली गेल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील जबाबदार रेल्वे प्रशासनातील अधिकार्यांवर राजशिष्टाचार भंगाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी केली आहे.