कसले शेतकऱ्यांचे कैवारी... शिवसेनेच्या विरोधात आता जनआंदोलन !
- आ.राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद - ‘शेतकऱ्यांचे कैवारी - शिवसेना’ असे फलक संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये लावल्याने शिवसेना शेतकऱ्यांचा कैवारी होत नाही. राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार जिंकावा म्हणून अपक्ष आमदारांसाठी देखिल मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी काल विशेष वेळ काढला परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील ३.५७ लाख शेतकऱ्यांना खरीप २०२० हंगामातील नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीला बाध्य करण्यासाठी उद्धवजींना वेळच मिळत नाही. हे कसले ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ ? असा संतप्त सवाल करत आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी ६ आठवड्यात बळीराजाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शिवसेनेच्या विरोधात जिल्याभरात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्या पूर्वी पाठविलेल्या पत्रात उच्च नायालयाच्या निकालाचा दाखला देत बजाज अलायन्झने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६ आठवड्यात नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्याची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्याच्या प्रतिनिधींना बोलावून वेळेत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला लावावी व यासाठी आपला ठाकरी बाणा वापरावा ही आग्रही मागणी केली होती. आधी लाल फितीत व तदनंतर न्यायालयीन प्रक्रीयेत हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा विषय अडकवण्याचे काम ठाकरे सरकार सातत्याने करत आहे. एकीकडे विमा कंपनीला नुकसान भरपाई द्यायला लावायची नाही आणि दुसरीकडून स्वतःही ती द्यायची नाही या ठाकरे सरकारच्या घृणास्पद भूमिकेचा तीव्र निषेध आहे.
६ पैकी ४ आठवडे पूर्ण झाले तरी देखील या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. दुसरी कडे राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र मुख्यमंत्र्यांना अपक्ष आमदारांची ‘मनधरणी’ करण्यासाठी वेळंच वेळ आहे. काल यासाठी त्यांनी विशेष बैठक वर्षा या त्यांच्या निवासस्थानी बोलाविली होती.
‘शेतकऱ्यांचे कैवारी - शिवसेना’ असे फलक संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये शिवसेनेने लावले आहेत खरे परंतु ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या हितासाठी साधी बैठक न लावणारे हे शेतकऱ्यांचे कैवारी कसे असू शकतात ? असा संतप्त प्रश्न उपस्थित करत ६ आठवड्यात बळीराजाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आता या बोलघेवड्या शिवसेने विरोधात तीव्र जनआंदोलन उभे करण्याचा इशारा आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.