उस्मानाबादेत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे हाणून शिवसैनिकांची जोरदार निदर्शने

 

उस्मानाबाद -  आयएनएस विक्रांत नौका खरेदी करण्याच्या नावाखाली निधी जमा करुन ही रक्कम राजभवन येथे जमा केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांना अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद येथे आज (दि.7) जोरदार निदर्शने करण्यात आली. खासदार सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारुन जनतेच्या भावनिकतेचा गैरफायदा घेतल्याचा निषेध करण्यात आला.

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या आंदोलनात खासदार सोमय्या यांचा तीव्र शब्दांत निषेध करुन तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे हाणून निषेध केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

इडीची कारवाई सोमय्यांना आधीच कशी कळते - राजेनिंबाळकर
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले, खासदार किरीट सोमय्या हे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आयएनएस विक्रांत ही बोट खरेदी करण्यासाठी म्हणून जनतेकडून पैसे गोळा केले. ही रक्कम राजभवन येथे जमा केले असल्याचे ते सांगत असले तरी एक रुपयाही त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे खासदार सोमय्या यांचे हे कृत्य देशद्रोही असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करुन इडीच्या कारवाईची माहिती त्यांना आधीच कशी कळते? असा सवालही राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला.

वाचाळवीराचे देशद्रोही काम - सोमाणी
खासदार किरीट सोमय्या यांनी गोरगरीब जनतेकडून आयएनएस विक्रांत या बोटीच्या नावाखाली निधी गोळा करुन लूट केली आहे. या वाचाळवीर नेत्याचे हे कृत्य देशद्रोही असून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, शहरप्रमुख संजय मुंडे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, डीसीसी बँकेचे संचालक संजय देसाई, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, सुरज साळुंके, राजाभाऊ पवार, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा विभागीय सचिव अक्षय ढोबळे,  माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, राजेंद्र घोडके, दीपक जाधव, भीमा जाधव, युवासेना जिल्हा समन्वयक तथा सरपंच संजय भोरे, मनोज केजकर, युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर, विभागप्रमुख मुकेश पाटील, अमोल मुळे, राजेंद्र भांगे, राजू तुपे, नेताजी पाटील, सौदागर जगताप, अण्णा पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.