ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले 

खुर्च्या व इतर साहित्यांची केली मोडतोड
 

उस्मानाबाद - पीक विमा कंपनी नुकसानीची रक्कम देण्यास टाळाटाळ  करीत असल्यामुळे संतप्त ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी आज  दि. २४ जानेवारी रोजी दुपारी उस्मानाबाद येथील भारतीय पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शाई फेक केली तसेच खुर्च्या व इतर साहित्यांची केली मोडतोड केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

 पीक विमा, अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान मिळावी यासाठी आ. कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीच्या सणातच आमरण उपोषण केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ मधील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा योजनेतील मार्गदर्शक सुचनांचा चुकीचा अर्थ लावून विमा कंपनीने नियमबाह्य पद्धतीने प्रत्यक्ष नुकसानीच्या केवळ ५० टक्केच नुकसान गृहीत धरून पीक विमा वितरित केलेला आहे. तर उर्वरित ५० टक्के रकमेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मागणींच्या अनुषंगाने‌ दिलेला नाही. 

खरीप २०२१ हंगामात जवळपास ७० ते ८० टक्के नुकसान झाले होते. मात्र विमा कंपनीने पीक कापणी व नुकसानीचा कालावधी यामध्ये १५ दिवसापेक्षा कमी असल्याचे कारण देत ५० टक्के भारांकन लावून विमा वितरीत केला आहे. तसेच जिल्हा व विभागीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून तक्रारींचे निरसन न झाल्यास राज्य स्तरीय समितीकडे तक्रार सादर करण्याचे व राज्य स्तरीय समितीचा निर्ण्य सर्व घटकांना मान्य असेल असे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे. पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश विमा कंपनीने अमान्य केल्यानंतर प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. तर विभागीय आयुक्तांनी विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन विमा कंपनीने चुकीचे निकष लावल्याचे मान्य करुन पुढील योग्य त्या कारवाईस्तव प्रकरण परत जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे आरआरसीची कारवाई करीत वसुलीचा प्रयत्न केला. मात्र विमा कंपनीने उच्च न्यायालयाकडून वसुलीला स्थगिती घेतल्याने प्रकरण थांबले आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी यापूर्वीच विमा कंपनीला अल्टीमेटम दिला होता. मात्र कंपनीने केवळ चालढकल धोरण अवलंबल्यामुळे शिवसैनिकांनी आपला आक्रमक बाणा प्रगट केला. 

यावेळी शिवसेनेचे माजी नगर परिषदेचे गटनेते सोमनाथ गुरव, अमोल जाधव, बंडू आदरकर, नितीन शेरखाने आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.