उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी 

आघाडीचे तीन संचालक बिनविरोध , भाजपची अग्निपरीक्षा 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येक एक संचालक बिनविरोध निवडून आला आहे. तिन्ही संचालक महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आहेत. यामुळे आघाडीचे पारडे सध्या जड आहे. निवडणुकीत भाजपचा कस लागणार आहे. अद्याप १२ जागांवर दोन पेक्षा अधिक उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी असून यामध्ये आणखी उलथापालथ हाेऊ शकते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी आहे. अर्ज काढण्यासाठी मोठा कालावधी असल्यामुळे सध्या पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. मातब्बर नेते बिनविरोध येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी काहींना यशही आले आहे. 

भूम सेवा सहकारी संस्था गटातून राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांच्या विरोधात सुरूवातीला कोणीही उमदेवारी अर्ज दाखल केला नव्हता. यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. त्या लागोपाठ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे बापूराव पाटील यांनीही उमरगा विविध सेवा सहकारी संस्था गटातून बिनविरोध येण्यात यश मिळवले आहे. त्यानंतर परंडा गटातून शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडून येण्यात यश मिळवले. दरम्यान हे तीन्ही उमेवार महाविकास आघाडीच्या पक्षातील आहेत. यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे.

अलीकडच्या प्रक्रियेत भाजपकडून काहीही हालचाल दिसून येत नाही. यामुळे भाजपच्या खेळीचा अद्याप अंदाज आलेला नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृतरित्या आघाडी किंवा युतीची घोषणाही केलेली नाही. एकीकडे शिवसेनेचे काही नेते महाविकास आघाडीला बळ मिळाल्याचा दावा करत असले तरी काँग्रेसने यापूर्वी सर्वनिवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यामुळे जिल्हा बँक नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार याचा सस्पेन्स कायम आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आठ दिवस उरले आहेत. हा काळ मोठा असून यादरम्यान आणखी घडामोडी घडू शकतात.