उस्मानाबादेत महागाईसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहातच आंदोलक घुसले
 
विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर दणाणून सोडला

उस्मानाबाद  - देशात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जीएसटी कमी करावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.५ ऑगस्ट रोजी आंदोलन केले. तर कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी घोषणाबाजी करीतच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रवेश करीत मागण्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.

सध्या देशात केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर अन्यायकारकपणे जीएसटी कर लावलेला आहे. अगोदरच सामान्य जनता महागाई व बेरोजगारीने परेशान असताना हा जीएसटीचा जाचक कर लावून आणखी परिस्थिती गंभीर केली आहे. त्यामुळे बहुतांश गोरगरीब व सामान्य जनता ही महागाईमुळे होरपळून निघत असल्यामुळे जीएसटीवरील कर तात्काळ हटविण्यात यावा. तसेच यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पाणी आल्यामुळे शेतात उभे असलेल्या पिकांत गाळ साचल्याने ती पिके खराब झालेली आहेत. 

<a href=https://youtube.com/embed/yvScNFJBKGo?autoplay=1><img src=https://img.youtube.com/vi/yvScNFJBKGo/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640">

शेतात पाणी प्रचंड असल्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी पिके घेता येणार नाहीत तर दुबार पेरणी करणे देखील शक्य नाही. महागाई बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेला जीएसटी तात्काळ मागे घेण्यात यावा, जिल्हा दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, या वर्षाचे पीक कर्ज माफ करण्यात यावे, खरडून गेलेल्या व गाळ असलेल्या शेत जमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोक मदत देण्यात यावी व फळ बागायतदारांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जर या मागण्यात मान्य केल्या नाहीत तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 


गॅस गेला हजारी पार, अन्नधान्यावर जीएसटीचा मार, गोरगरिबांना सुद्धा लुटून खाते,  हे निर्लज्ज मोदी सरकार....पेट्रोल शंभरी तर गॅस हजाराच्या पार, बस करा मोदीजी थांबवा आता लुटमार....जीएसटीच्या नावाखाली महागाईचे वार, कधी थांबवेल मोदी सरकार जनतेची लुटमार.....एकीकडे दोन उद्योगपती, दुसरीकडे भुके कंगाल, मोदी सरकारच्या कारकिर्दीत जनतेचे नुसते हाल.... कसलं हे सरकार, कसला हा कारभार, दोन वेळच्या जेवणासाठी ही झाली आज मारामार.... सगळीकडे सुरू आहे नुसता भोंगळ कारभार, जबाबदार आहे त्याला फक्त मोदी सरकार असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेऊन मोदी व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत जाहीर निषेध केला.

आंदोलक घुसले जिल्हाधिकारी सभागृहातच !

 विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कौतुक दिवेगावकर यांना देण्यासाठी आंदोलक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सभागृहात आढावा बैठक घेत आहेत, असे समजल्याने हा मोर्चा थेट सभागृहातच घुसला. जिल्हाधिकारी आवार व सभागृहात देखील महागाई व मोदी विरोधी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदीसह अधिकारी व आंदोलक उपस्थित होते.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, वरीष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, प्रशांत पाटील, विलास शाळू, डीसीसी बँकेचे संचालक महेबूब पटेल, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सरचिटणीस दादा पाटील, ऍड. जावेद काझी, डॉ आंबेडकर कारखान्याचे संचालक आयुब पटेल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सिद्धार्थ बनसोडे, विधी विभाग अध्यक्ष ऍड.विश्वजित शिंदे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष काका सोनटक्के, प्रदेश सरचिटणीस धनंजय राऊत, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, आनंदराव घोगरे, कफिल सय्यद, सुभाष हिंगमिरे, अवधूत क्षीरसागर, प्रभाकर डोंबाळे, अभिमान पेठे, संजय गजधने, शैलेश देव, सलमान शेख, अशोकराव बनसोडे, आरेफ मुलाणी, लियाकत मोमीन, अज्जू शेख, स्वप्नील शिंगाडे, महादेव पेठे, भारत काटे, मुख्तार शेख, सचिन धाकतोडे, बालाजी नायकल, बप्पा खोत, खय्युम सय्यद, अलताफ मुलाणी, अभिजित देडे, ऍड.राहुल लोखंडे, प्रेमानंद सपकाळ, समाधान घाटशिळे यांच्यासह  पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.