कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११७२६.९१ कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपच्यावतीने जल्लोष

 

उस्मानाबाद  - कृष्णा मराठवाडा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत ११७२६.९१ कोटी रुपयांची मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दि.४ ऑक्टोबर रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या निर्णयास मान्यता दिली. या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जल्लोष साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प दि.४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ११७२६.९१ कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, उमरगा लोहारा व उस्मानाबाद तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील १३३ गावांतील २३.६६ टीएमसी मर्यादेत एकूण ३ उपसा सिंचन योजनेद्वारे १ लाख १४ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे 

योजनेचा मोठा भाग अवर्षण प्रवन भागात येत असल्यामुळे लाभ क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा उपलब्ध होण्यास मदत आहे. या प्रकल्पांतर्गत प्रथम फेजमध्ये परंडा, भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा व उमरगा या ८ तालुक्यांसाठी उपसा सिंचन योजना क्र. १ व २ द्वारे एकूण १२ टप्प्याद्वारे पाणी उपसा करण्यात येणार असून त्याद्वारे ८९ गावांमधील २५७९८१ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ४४ गावांमधील ८१४७ हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजना क्र.३ द्वारे सिंचनाखाली येणार असून एकूण दोन्ही जिल्ह्यामधील ३३९४५ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

या निर्णयाचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष राहुल काकडे, ऍड. खंडेराव चौरे, पांडुरंग लाटे, विनायक कुलकर्णी, अभय इंगळे,  सचिन तावडे, संदीप इंगळे, वैभव हंचाटे, प्रवीण पाठक, सुजित साळुंके, दिनेश पवार, सार्थक पाटील, आशिष येरकळ, सुजित उंबरे, प्रसाद मुंडे, धनराज नवले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.