भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी धावणार 3000 स्पर्धक

 

उस्मानाबाद - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिक धावणार आहेत. उस्मानाबाद स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या वतीने तिसर्‍या हाफ मॅरेथॉन स्पर्धेेचे 18 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नोंदणीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून 3000 जणांनी नोेंदणी केल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

उस्मानाबाद शहरात गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येते. कोरोना काळात देखील या स्पर्धेला गतवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, विधि, व्यापारी यांच्यासह राज्यातील विविध भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

यावर्षीही स्पर्धेत नोंदणीसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. या कालावधीत देशभरातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. मुदतीअखेर 3000 जणांनी नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या आयोजनात शहरातील विविध संस्था, संघटनांचे सहकार्य लाभले आहे. यावर्षीची स्पर्धा देखील भव्यदिव्य होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

स्पर्धेच्या आदल्या दिवशी 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत स्पर्धेत सहभागी होणार्‍यांना टी-शर्ट व इतर साहित्य वितरित करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

18 डिसेंबर रोजी तुळजाभवानी स्टेडियम येथून पहाटे 5 वाजता उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनला सुरुवात होईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, सेंट्रल बिल्डिंग रोड, राजमाता जिजाऊ चौक या मार्गे हातलादेवी रोड आणि परत तुळजाभवानी स्टेडियम असा हाफ मॅरेथॉनचा मार्ग असल्याचे संयोजकांनी कळविले