उस्मानाबाद - तुळजापूर- सोलापूर रेल्वे मार्गाचे काम राज्याच्या निधी अभावी बंद पडण्याच्या स्थितीत

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष देण्याची गरज

 
- आ.राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद - तुळजापूर- सोलापूर रेल्वेमार्गासाठी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारने रु.२२ कोटीची तरतूद केली असून राज्य सरकारने समप्रमाणात हिस्सा जमा न केल्यास या प्रकल्पाचे काम बंद पडु शकते त्यामुळे राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने रु.२२ कोटी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची वर्चुअल बैठक बोलवावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे  यांच्याकडे केली आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गाने जोडावे ही देशभरातील भाविकांसह या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. हा रेल्वेमार्ग पुर्ण झाल्यानंतर या भागाचा आर्थीक विकासाला आणखीन चालना मिळणार आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेत पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी साहेबांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ८४.४४ कि.मी. लांबीचा व रु.९०४.९२ कोटी किमतीचा  रेल्वे मार्ग मंजूर करून सन २०१९ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले. 

हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी राज्यातील इतर महत्वाच्या प्रकल्पा प्रमाणे खर्चाचा ५० टक्के हिस्सा उचलण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी सन २०१९ मध्ये मान्य केले होते, व या अनुषंगाने तत्कालीन रेल्वे मंत्री ना.पियुषजी गोयल यांना कळविले होते. तसेच तत्कालीन प्रधान सचिव गृह (परिवहन व बंदरे) यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री. मुकेश कुमार गुप्ता यांना याबाबतची राज्य सरकारची अधिकृत सहमती कळविली होती. 

केंद्र सरकारने आर्थीक वर्ष २०२१-२२ मध्ये या प्रकल्पासाठी रु.२२ कोटी ची तरतूद केली आहे, व प्रकल्पाचे काम सुरळीत पणे सुरू रहावे यासाठी सम प्रमाणातील राज्याच्या हिस्याच्या  रकमेची तरतूद करण्याबाबत रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) यांनी प्रधान सचिव गृह (परिवहन व बंदरे) यांच्याकडे मागणी केली आहे.  या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण व भुसंपादनाच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे.  परंतु परिवहन मंत्री ना.अनिलजी परब यांनी " सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही " असे तथ्यहीन विधान याबाबतच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेमध्ये केले होते. 

 राज्याने ५० टक्के हिस्सा देण्याचे मान्य केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील या रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा देण्याबाबत त्यांची अनाकलनीय नकारात्मकता दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पुणे नाशिक रेल्वे मार्ग साठी रु.१०० कोटींची तरतूद करण्यात आली, परंतु सोलापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा पुरवणी मागण्यांमध्ये साधा उल्लेख देखील करण्यात आला नाही. त्यामुळे उस्मानाबाद करांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाचे काम बंद पडू नये, वेगाने सुरु व्हावे व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष देणे अपेक्षित असून प्रकल्पाचे काम थांबू नये यासाठी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने रु.२२ कोटी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची व्हर्च्युअल बैठक घेऊन देशभरातील आई तुळजाभवानीच्या लाखों भक्तांसह जिल्हावासीयांना न्याय दयावा अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.