राजकीय नेत्याला लाजवेल असा तेरच्या पोलिसाचा वाढदिवस साजरा ...

सोशल डिस्टिन्सिंगचा पुरता बोजवारा ...
 
अवैध धंदेवाल्याकडूनच खर्च  वसूल 

तेर  - एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा व्हावा तश्याच पद्धतीने तेर पोलीस चौकीचा पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर याचा वाढदिवस  15 जुलै ( गुरुवार )  रोजी साजरा करण्यात आला, तेही चक्क पोलीस चौकीत ...

यासाठी पोलीस चौकी परिसरात मंडप घालण्यात आला होता, संगीताची धून सुरु होती. बिर्याणीचा घमघमाट सुटला होता. त्यामुळे वाढदिवस दणक्यात साजरा झाला. 

मुरळीकर यास येणारा प्रत्येक जण कुणी फेटा बांधत होता, कुणी पुष्पहार घालत होता तर कुणी बुके देत होता  तर कुणी गिफ्ट देत होता.  साहेब तसे अवैध धंदे करणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेतच म्हणा  ! 

दुसरीकडे येणाऱ्या प्रत्येकाला बिर्याणीची खास मेजवानी देण्यात आली. या वाढदिवसाला अवैध धंदे करणारे तथाकथित समाजसेवक , काही गल्लीतील पुढारी तसेच  ढोकी पोलिस ठाण्याचे  ए पी आय सुरेश बनसोडे व पोलीस उपनिरीक्षक बुद्धेवार यांची खास उपस्थिती होती.

या वाढदिवसाचा सर्व  खर्च अवैध धंदेवाल्याकडूनच वसूल करण्यात आला , त्यामुळे खर्चाची चिंता नव्हती ...त्यामुळे वाढदिवस मोठया थाटात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

सध्या कोरोना महामारी असल्याने जनतेवर निर्बंध लादण्यात आले आहेत, येथे मात्र सोशल  डिस्टिन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता, इतकेच काय तर एकाच्याही तोंडावर मास्क दिसला नाही...कोरोना येथे पार चेंगरून मेला होता....

इतरांना नियम शिकवणारे पोलीस मात्र स्वतःच्या वाढदिवसला नियमाचे उल्लंघन करताना पाहून, तेरची जनता मात्र हतबल होवून हा वाढदिवस सोहळा पाहत होती  !

धन्य ते मुरळीकर आणि धन्य ते ढोकी पोलीस !