अणदूर अत्याचार प्रकरणी महिलांची निषेध फेरी
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूरमध्ये नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर २७ जानेवारी रोजी तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता, या प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेचा गावातील महिलांनी निषेध फेरी काढून निषेध सभा घेतली.
अणदूर हे सुशिक्षित व सुरक्षित गाव म्हणून ओळखले जाते.त्यास गालबोट लागले आहे, अशी खंत व्यक्त करीत गावातील महिलांनी गावातील महिलांनी निषेध फेरी काढून निषेध सभा घेतली. यावेळी प्रा. अनिता मुदकण्णा, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुजाता चव्हाण, माजी सरपंच सरिता मोकाशे, मीरा घुगे, प्रतिभा कंदले, निता पाटील, पोर्णिमा कुलकर्णी, आलुरे यांनी या घटनेचा निषेध करून फरार आरोपीस अटक करा व सर्व गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी केली.
महिलावरील वाढते अत्याचार तातडीने रोखण्याची गरज असून सुजाण नागरिकांनी ठोस पावले उचलण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच शशिकला शेटे, भाजपा शहर महिला आघाडी अध्यक्ष जयश्री स्वामी, संजीवनी आलुरे, सुवर्णा मोकाशे, जयश्री नाटेकर आदीसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या घटनेच्या निषेधार्थ यापूर्वी दोन वेळा गावातील बाजारपेठ बंद करण्यात आली होती, तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. गावास भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट देऊन निषेध व्यक्त केला होता तसेच नराधमावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
या अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नळदुर्ग पोलिसांच्या कारभारावर यानिमित्त संशय व्यक्त केला जातोय. तिसरा आरोपी हा एका राजकीय पुढाऱ्याजवळ उठबस करणारा असून, त्यामुळेच तो फरार होण्यात यशस्वी ठरला, असा आरोप केला जातोय.