आसूच्या त्या मयत कोरोनाग्रस्त रुग्णाचा आरोप चुकीचा - जिल्हाधिकारी

 


उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील आसू येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा ऑक्सिजन बंद केल्याने  मृत्यू झाला होता. त्याने मृत्यूपूर्वी व्हिडीओ जारी करून रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले होते. मात्र रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली तसेच आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या रुग्णाचा आरोप चुकीचा असल्याचा दावा केला.



      दोन दिवसापूर्वी  जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्षात रमजान मंजूर पटेल  (वय 38 रा. आसू ता. परंडा ) या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता. रुग्णसेवेत हलगर्जीपणा केल्याने रमजान पटेल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरात मोठी खळबळ माजली होती.

या घटनेने उस्मानाबाद जिल्हा आरोग्य रुग्णालयासह जिल्हा प्रशासनाचे धिंडवडे निघाल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे म्हणाल्या, रमजान पटेल या रुग्णाच्या मृत्यूनंतर आपण स्वतः जिल्हा रुग्णालयातील कक्षाची पाहणी केली. सदर रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी खोकला आणि ताप तिच्या आजाराने त्रस्त होता. ऑक्सिजन बंद केल्याचा आरोप चुकीचा असून, उपचार घेणाऱ्या इतर रुग्णाला देखील या ऑक्सिजनचा पुरवठा सातत्याने होत होता.उपचारासाठी दाखल असणाऱ्या सर्व रुग्णांची काळजी घेण्यासाठी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत त्यामुळे ऑक्सिजन बंद केल्याचा आरोप करणं चुकीचे असल्याचे जिल्हाधिकारी मुधोळ-मुंढे यांनी सांगितले.