उस्मानाबाद जिल्ह्यात मुद्रांकचा काळाबाजार , अधिकारी थंड

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून    मुंद्रांकांचा तुटवडा निर्माण झाला असून काळाबाजार बोकाळला आहे. १०० रुपयांचा मुद्रांक १५० ते २०० रुपयांना विक्री केला जात आहे.त्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

सध्या काही बँकांमधून मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. पीककर्ज उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरीही तातडीने प्रक्रिया करून पदरात कर्ज पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच मुद्रांकाचा काळाबाजार करणाऱ्यांचे फावत आहे. शेतकऱ्यांकडे अन्य कोणताही पर्याय नसल्यामुळे मागेल तीतकी किंमत देऊन मुद्रांक खरेदी करून प्रक्रिया पूर्ण करण्यावर शेतकरी भर देत आहेत.


सद्यस्थितीत पीककर्ज काढण्यासाठी तसेच बँका, फायनान्स कंपन्यांमध्ये तसेच अन्य कर्ज प्रकरणे करण्यासाठी मुद्रांकाची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकांची मागणी करण्यात येत आहे. परिणामी याचा काळाबाजार बोकाळला आहे. जिल्ह्यात काही बोटावर मोजण्याइतके विक्रेते वगळता अनेकजण याचा फायदा उचलत आहेत. १०० रुपयांचे मुद्रांक चक्क १५० ते २०० रुपयांना विकले जात आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु असून, शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेकडे अर्ज दाखल करीत आहेत. पीक कर्ज फाईलमध्ये शंभर रुपयांचे किमान तीन मुद्रांक लागत असून,याचाच गैरफायदा मुद्रांक विक्रेते उचलत आहेत. १०० रुपयांचे मुद्रांक चक्क १५० ते २०० रुपयांना विकले जात आहे.जिल्ह्यात मुद्रांकचा काळाबाजार सुरु असला तरी संबंधित अधिकारी डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प आहेत.

 उस्मानाबादेत पाच वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या वतीने छापे मारले होते. त्यावेळी अनेकांवर कारवाया झाल्या होत्या. तेव्हापासून कोणत्याही यासंदर्भात कारवाया करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी या व्यववस्थेवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.