इंदू मिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा

 


उस्मानाबाद - शिवाजी पार्क येथे इंदू मिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यास विरोध करण्याच्या त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे जनता दल सेक्युलर पक्षाने स्वागत केले आहे. मात्र, इंडिया युनायटेड मिलच्या या जागेवर डाॅक्टर आंबेडकर यांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या धर्तीवर अर्थशास्त्राचा अभ्यास, संशोधन आणि शिक्षण देणारी जागतिक दर्जाची संस्था उभी करावी, अशी मागणी जनता दल से पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.


बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी, शिवाजी पार्क येथील इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्या ऐवजी तो पैसा कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी वापरावा, असे म्हटले आहे. पुतळा उभारण्यास विरोध करण्याच्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे जनता दलाने स्वागत केले आहे. मात्र, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक व्हायलाच हवे, मात्र, ते केवळ पुतळ्याच्या स्वरुपात नको. कारण कितीही उंचीचा पुतळा केला तरी बाबासाहेबांच्या कीर्तीची तो बरोबरी करू शकणार नाही. त्यामुळे त्यांचे खरे स्मारक उभारायचे असेल तर *लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स* च्या धर्तीवर इंदू मिलच्या जागेवर जागतिक दर्जाची अर्थशास्त्रातील शिक्षण देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नावाने जागतिक दर्जाची संस्था उभी करावी आणि तिच्या आवारात त्या इमारतीला साजेसा बाबासाहेबांचा पुतळा उभारावा, असे पक्षाने म्हटले आहे.


 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुख्यत: घटनातज्ञ, संविधान निर्माते अशी ओळख भारतीय जनतेसमोर आहे. परंतु ते तेवढ्याच तोलामोलाचे अर्थतज्ञ होते. किंबहुना अर्थशास्त्रात पीएचडी करणारे ते पहिले भारतीय आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी १९१७ मध्ये पीएचडी केली होती. त्यानंतर पुन्हा १९२३ मध्ये इंग्लंडच्या लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स मधून त्यांनी डाॅक्टरेट मिळवली होती. ब्रिटिशकालीन भारतीय अर्थव्यवस्थेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अॅडमिनीस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स आॅफ इस्ट इंडिया कंपनी, दि इव्होल्यूशन आॅफ द पब्लिक फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि द प्राॅब्लेम आॅफ रुपी: इटस् ओरिजिन अॅन्ड सोल्युशन ही त्यांची अर्थशास्त्रातील गाजलेली पुस्तके आहेत. 


ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन, राज्य सरकारने इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रात संशोधन आणि शिक्षण देणारी जागतिक दर्जाची शिक्षण संस्था सुरू करणेच योग्य ठरेल. अलिकडच्या काळात अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी या दोन भारतीयांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. जगभरातील असे विद्वान विद्यार्थी या संस्थेतून शिकून पडतील त्यावेळी बाबासाहेबांचे नाव आपोआपच त्यांच्या बरोबर जगभर जाईल, असे ॲड भोसले यांनी म्हटले आहे .