माणकेश्वरच्या सटवाई देवीसमोर बेसुमार पशुहत्या  

 पशुहत्या बंद करण्याचे तहसिलदारांचे आदेश
 

भूम - तालुक्यातील माणकेश्वरच्या सटवाई देवीसमोर  दर मंगळवारी, शुक्रवारी आणि यात्रेच्या दिवशी कोंबडे व बकरे कापून अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात होता.  त्यामुळे या परिसरात रक्ताचे पाट वाहून दुर्गंधी सुटत होती. एका तक्रारीनंतर पशुहत्या बंद करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले आहेत. 

भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील श्री क्षेत्र सटवाई देवस्थान येथे भाविकांकडून अंधश्रद्धेच्या नावाखाली कोंबडे व बकरे यांचा बळी देण्याची प्रथम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ती बंद करण्यात यावी व मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यात यावा अशी मागणी राईटस फाऊंडेशनचे सचिव गणेश भीमराव अंधारे यांनी तहसिलदाराकडे एका निवेदनाद्वारे केली होती. 


त्याची दखल घेत तहसिलदारांनी देवस्थानला आदेश दिले असून दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री श्रेत्र सटवाई देवस्थानवर कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारी कोंबडे व बकरे बळी प्रथा तातडीने बंद करण्यात यावी. अन्यथा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत योग्य ती कारवाई सटवाई देवस्थानवर करण्यात येईल व यापुढे कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास सटवाई देवस्थान जबाबदार असेल असे निर्देश सटवाई देवस्थानला दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईच्या नोटिसा माहितीस्तव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, भूम, पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे परंडा, तलाठी सज्जा, माणकेश्वर, तसेच श्री क्षेत्र सटवाई देवस्थान माणकेश्वर यांना या आदेशाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.यामुळे माणकेश्वर येथे दिल्या जाणाऱ्या पशुंचा बळी थांबण्यास मदत होणार असून अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.