उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट विमा मिळणार ?
उस्मानाबाद - ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी सर्व बाधीत शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी या अनुषंगाने कृषी आयुक्त दि. ६ जानेवारी 2021 रोजी बैठक घेणार असल्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी कळविले आहे.
जिल्हयातील 9 लाख 48 हजार 990 शेतक-यांनी विविध पिकांसाठी विमा भरला असताना केवळ 60 हजार जणांनाच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. 12 हजार शेतक-यांचे दावे केवळ मुदतीत अर्ज न आल्याचे कारण देत फेटाळण्यात आले आहेत. अर्ज न केलेल्या शेतक-यांचा तर विचारच करण्यात आलेला नाही.
या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून प्रशासन स्तरावर देखील पाठपुरावा सुरू आहे. कृषी आयुक्त .धीरज कुमार यांच्याशी चर्चा झाली असून दि. 6 जानेवारीला विमा कंपनी अधिकार्यां सोबत होणा-या बैठकीमध्ये ज्या भागामध्ये नुकसान झाले आहे, त्या भागातील सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपनीकडे आग्रह करण्याचे ठरले आहे.
मागील वर्षी अशाच प्रकारे झालेल्या नुकसानीच्या भरपाई बाबत तत्कालीन मुख्यमंत्री .देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सरसकट विमा देण्यासाठी विमा कंपनीला आदेशीत करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने विमा कंपनीने अशीच परिस्थिती असताना सरसकट मदत केली होती. कृषी आयुक्तांना याबाबत आवर्जुन सांगितले असून हा विषय बैठकीमध्ये अशा प्रकारे घेण्याची मागणी केली आहे. कृषी आयुक्तांनी देखील उशीराने आलेले अर्ज ग्राहय धरणेबाबत व अर्ज न केलेल्या शेतक-यांना देखील सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपनीकडे आग्रह करण्याचे मान्य केले आहे.
करारा प्रमाणे 72 तासाची अट रदद करण्याचे तसेच प्राप्त परिस्थितीमध्ये महसूल विभागाचे पंचनामे ग्राहय धरण्याच्या विमा कंपन्यांना सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने देखील आग्रह करू असे देखील कृषी आयुक्त म्हणाले आहेत.दि. 6 जानेवारीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीची भुमिका स्पष्ट होणार असून त्यानंतर या महत्वपुर्ण व संवेदनशील विषयाबाबत पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे. या विषयाबाबत अनेक शेतकरी आ . राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संपर्कात आहेत, नुकसान भरपाई मिळेल का नाही याबाबत चिंतेत आहेत . परंतु शेतकऱ्यांनी काळजी करू नये. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत सहभागी सर्व बाधीत शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल या भुमिकेवर आ.राणाजगजितसिंह पाटील ठाम आहेत.