बिनविरोध  ग्रामपंचायतींना ६० लक्ष पर्यंत विकास निधी - आ. राणा जगजितसिंह 

 

उस्मानाबाद - ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० ची प्रक्रिया सुरू असून आज छाननी नंतर वैद्य नामनिर्देशीत उमेदवारांची नावे व संख्या निश्चित झाली आहे. दि. ४ जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत असून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध  करण्याचा हा खऱ्या अर्थाने योग्य कालावधी आहे.   गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आदर्श ग्राम निर्मितीसाठी बिनविरोध निवडणुका होणे उपयुक्त आहे व या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी अशा गावांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
 
  विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांच्या स्थानिक विकास निधी बरोबरच जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद व इतर शासकीय योजनांसह आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ९ पर्यन्त सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना रु. २५ लक्ष, ११-१५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना रु.४० लक्ष तर १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना रु.६० लक्ष विकास निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.
 
  ज्या गावांमध्ये बिनविरोध निवडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांनी प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे अथवा  ८८८८६२७७७७ या WhatsApp नंबर वर नोंदणी करावी. सर्व पक्षातील नेत्यांच्या मदतीने सदरील ग्राम पंचायती बिनविरोध काढण्यासाठी जिल्हा स्तरावरून देखील प्रयत्न केले जातील.
 
आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील वरिष्ठांसह युवकांनी एकत्रित येवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायती बिनविरोध काढण्यासाठी पुढील ४ दिवस प्रयत्न करावा, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.