जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर रमले नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात... 

चार तास पायी फिरून केली पाहणी 
 

नळदुर्ग - नळदुर्गचा भुईकोट किल्ला एका खासगी कंपनीने सुशोभिकरण केल्यामुळे पर्यटकांची  संख्या वाढली आहे. मात्र गेली आठ महिने कोरोना लॉकडाऊनमुळे हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. मागील आठवड्यात किल्ल्यात प्रवेश सुरु करण्यात आला आहे.  

 नळदुर्गच्या या  ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यास शनिवार दि. 26 डिसेंबर रोजी उस्मानाबाद  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कुटूंबियासह भेट देवुन प्राचीन वास्तु, पुरातन तोफा व किल्ल्याच्या परिसराची चार तास पायी फिरून पाहणी केली. 

नळदुर्ग येथील किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला असून शासनाकडुन जतन व संगोपनार्थ युनिटी मल्ट्रिकॉन कंपनीने घेवून सुशोभिकरण केल्याने देश-विदेशातील पर्यटकासाठी हा किल्ला पर्वणी ठरल्याचे सर्वश्रुत आहे. या ठिकाणी सोयीसाठी प्रदुषण विरहीत इलेक्ट्रिकल कार आहे व बहुतेक वेळा अधिकारी अथवा प्रतिष्ठित व्यक्ती या कारचा वापर करतात. मात्र जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी संपूर्ण किल्ला पायी फिरण्याबरोबरच उंच आसलेला उपली बुरूजही चढून पाहिला. जिल्हाधिका-यांनी किल्ल्यातील अनेक पुरातन वास्तुंचे फोटोही काढले. सकाळी आकरा वाजता किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत किल्ल्याची पाहणी केली.  

किल्ल्यातील पाणी महल, उपळी बुरूज, मुन्सिफ कोर्ट आदीसह पुरातन तोफ, बारादरी,  पाणचक्कीचे निरिक्षण करुन ऐतिहासिक वस्तुंची माहिती घेतली. यावेळी मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी तुकाराम कदम, नगरसेवक शहबाज काझी, युनिटीचे आदील मौलवी,‍ व्यवस्थापक जुबेर काझी, हाजी शेख यांच्यासह युनिटी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे हानी

 ऑक्टोबर महिन्यात नळदुर्ग परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्याचा फटका  नळदुर्गच्या  भुईकोट किल्ल्यास बसला आहे. नर - मादी धबधबा वरील भाग तसेच किल्ल्यातील अन्य भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.