१४ वर्षाच्या मेहुणीबरोबर तिसऱ्यांदा बाशिंग बांधणारा भाऊजी चतुर्भुज
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बालविवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलीचे वय १८ होण्याअगोरच तिचं लग्न लावून देण्याची कुप्रथा वाढत चालली आहे. उमरग्यात १४ वर्षाच्या मेहुणीबरोबर तिसऱ्यांदा बाशिंग बांधणारा भाऊजी चतुर्भुज करण्यात पोलिसांना यश आलं आहे. उमरगा शहरातील मुळज रोड लागत उर्दू शाळेच्या परिसरात हा बालविवाह होणार होता.
रविवारी ( ५ डिसेंबर ) सकाळी दहा वाजता उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गुप्त माहिती भेटली की,"मुळज रोड लागत असलेल्या उर्दू शाळेच्या परिसरात, एका 14 वर्षीय मुलीचा ४८ र्षाच्या पुरुषाशी छुप्या रीतीने घरातल्या घरात विवाह संपन्न होणार आहे". पण संबंधित परिवाराचे नाव, घर इतर काहीच माहिती उपलब्ध नाही. प्राप्त अल्पश: माहितीच्या आधारे समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी तहसीलदार राहुल पाटील आणि पो. नि. इकबाल सय्यद आदींना कल्पना दिली व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांना बोलावून घेतले.
काही क्षणातच महसूल प्रशासनाचे, मंडळ अधिकारी श्री दीपक चव्हाण सह उमरगा तलाठी माचन्ना एस ए आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने बिट अंमलदार बालाजी कामतकर व पो. ना. लक्ष्मन शिंदे मुळज रोड ला उपस्थित झाले.काही क्षणातच या बालविवाहाची माहिती व त्यावर रोखण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी चर्चा झाली व शोध मोहिमेला सुरुवात झाली, इतक्यात एका घरासमोर दोन बकरी(कापण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत)आढळून आले.त्यावर विचारणा केली असता मुलीच्या आईने मान्य केले की आज विवाह जुळविण्याचा(कुंकू लावण्याचा )कार्यक्रम आहे.समोर दिसणारे चित्र अंगावर शहारे आणणारे होते.कारण नवरी मुलगी कपाळीला कुंकू अन् हातात बांगड्या होत्या तर मुलीचे वय अगदी 14 वर्षे होते.पोलीस नाईक लक्ष्मण शिंदे, मंडळ अधिकारी चव्हाण आणि मुख्याध्यापक श्री मोरे यांच्यासह समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी बालविवाह कायद्याची माहीती देत, मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केले तर अठरा वायोपूर्ती नंतर योग्य अश्या मुलासोबतच विवाह करा, मुलीचे आयुष्य उद्धवस्त करू नका असे परखड शब्दात कानउघाडणी केली.
दरम्यान नियोजित बाळविवाहतील नवरदेव हा त्या मुलीचा भाऊजी असल्याचे समजले. तर हा त्याचा विवाह 'तिसरा' होणार होता. या पूर्वी दोन विवाह त्या पुरुषाचे झाले असून दोन्ही पत्नी मयत आहेत तर त्यापैकी दुसऱ्या पत्नीने विहिरीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. हा सर्व प्रकार समोर येताच मुलीच्या आईचाच हा ''बालविवाह' जुळविण्याचा कट असल्याचे भासत होते त्यावर मुलीच्या आईला पोलिसांनी तंबी भरली व नवरा पुरुषाला पण खडसावून कायद्याचे ज्ञान दिले.मुलीच्या आईकडून व नवरा मुलगा (48 वर्षीय) पुरुषांकडून लेखी हमिपत्र घेत उपस्थित पाहुणे मंडळींनी च्या स्वाक्षऱ्याने पंचनामा करून नियोजित बालविवाह रोखण्यात उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीला मोठे यश आले.
"केवळ बालविवाह रोखून बालविवाहाला आळा बसणार नाही तर बालविवाह का होतात..?शासन यावर उपाययोजना आखून, रोखलेल्या बालविवाह वर मोनिटरिंग करणे तितकेच महत्वाचे आहे.बालविवाह हे देशाच्या प्रगतीला(जि डी पि ग्रोथ)ला निर्माण होणारी अप्रत्यक्ष अडथळा आहे यावर वेळीच उपाययोजना आखणे गरजेचे आहे"
-- सचिन बिद्री,,सदस्य,उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती