उस्मानाबाद पोलीस दलातील १३ पोलिसांच्या बदल्या काही दिवसांतच रद्द 

स्थानिक गुन्हे शाखेत वादग्रस्त पोलिसांची नियुक्ती 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलात बदल्यावरून सध्या मोठा घोळ सुरु आहे. काही दिवसापूर्वी विनंतीनुसार १३ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, पण या पोलिसांच्या बदल्या अवघ्या काही दिवसात रद्द करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांची नागपूरला बदली झाली आहे. जाता जाता त्यांनी उस्मानाबाद पोलीस  दलातील १३ पोलिसांच्या बदल्या केल्या  होत्या. त्यावर  मागील तारीख टाकून आवक - जावक नंबर देखील टाकण्यात आला होता. पण त्याची तक्रार थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कानावर जाताच या बदल्या अवघ्या काही दिवसांत रद्द करण्यात आल्या आहेत. 

तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील चार पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या असून आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये काही वादग्रस्त पोलिसांचा समावेश आहे. काहींची मागील काळात केलेल्या गैरप्रकाराची चौकशी सुरु असताना त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. या नियुक्त्या करताना 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा सुरु आहे. 

१३ पोलिसांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील चार पोलिसांच्या बदल्या रद्द होणार का ? तसेच  नव्याने नियुक्त कण्यात आलेल्या आठ पोलिसांना पूर्वीच्या ठिकाणी परत पाठवणार का ?  याकडे लक्ष वेधले आहे.