अभिमान आहे ! उस्मानाबादची लेक ठरली देशातील सर्वात कमी वयाची महिला आयपीएस 

 

उस्मानाबाद - भातागळी, ता.लोहारा येथील कु.नितीशा संजय जगताप हिने अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून १९९ वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे.

आज नितीशाचे देशभरात कौतुक होत आहे, पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता... नितीशा लहानपणापासूनच अभ्यासू, हुशार आणि जिद्दी होती. कॉलेज सुरू असतानाच तिने यूपीएससीसाठी तयारी सुरू केली होती.

समाजातल्या गरजू लोकांना मदत करण्याच्या इच्छेतून प्रशासकीय सेवेसाठी तिने प्रयत्न सुरू केले. हे सुरू असतानाच फर्ग्युसन महाविद्यालयातून तीने बी.ए. (सायकॉलॉजी) पूर्ण केले.

सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी सेवा परीक्षेत देशात १९९ व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. आता २६ मार्चपासून हैदराबाद नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये तिचे प्रशिक्षण सुरू होईल.

नितीशाचे हे यश उस्मानाबादकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून उस्मानाबादच्या युवकांमध्ये मोठी गुणवत्ता असल्याचे पुन्हा या निमित्ताने सिद्ध झाले आहे. इथल्या युवकांना योग्य संधी मिळाली तर केवळ स्वतःचेच नाही तर जिल्ह्याचे, देशाचे नाव ते मोठे करू शकतात हा निश्चितच विश्वास आहे...

कुमारी नितीशाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...