उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कमिशन वाटणीवरून दोन कर्मचाऱ्यात 'फ्री स्टाईल' हाणामारी

सीसीटीव्ही फुटेज प्रकरणी धक्कादायक माहिती 
 

उस्मानाबाद -  जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरु आहे, कामाचे कंत्राट देताना टक्केवारी घेणे तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बिले यात चिरीमिरी घेणे रासरोस सुरु आहे. आलेल्या या रक्कमेच्या  वाटणीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात दोन कर्मचाऱ्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज मागणी केली असता, धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 


जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात कोरोना काळात शासकीय रक्कमेची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली. अनेक बोगस बिले जोडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला. कामाचे कंत्राट देताना कमिशन घेण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, त्यांची बिले काढताना चिरीमिरी घेण्यात आली. आलेल्या या कमिशन वाटणीवरून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  आणि जिल्हा अकांऊट व्यवस्थापक यांच्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनातच फ्री स्टाईल हाणामारी झाली. हा प्रकार २७ जून रोजी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. 

 या प्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज मागणी केली असता,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात सीसीटीव्ही  बसवण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरु आहे. त्याचा बोभाटा होऊ नये म्हणून सीसीटीव्ही  बसवण्यात आले नाहीत , असा आरोप सुभेदार यांनी केला आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जे आरोग्य कर्मचारी चिरीमिरी देतात त्यांचे बिलं तातडीने काढले जातात आणि  जे कर्मचारी चिरीमिरी देत नाहीत त्यांची बिले पेंडिंग ठेवली जातात , यामुळेच जिल्ह्यातील सर्व उप केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी यांचा  प्रोत्साहन भत्ता चार महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आला  आहे.