शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या उपोषण आंदोलनाची गावागावात जनजागृती

 

उस्मानाबाद - गोरगरीब शेतकर्‍यांची बाजू विचारात न घेता महसूल प्रशासनाने वर्ग 1 च्या जमिनी वर्ग 2 मध्ये घेऊन अन्याय केल्याच्या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या वतीने 27 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे. या उपोषण आंदोलनात पीडित शेतकरी, प्लॉटधारकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या वतीने गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाने घेेतलेल्या अन्यायकारी निर्णयाविरोधात आवाज उठविण्यासाठी मोठ्या संख्येने उपोषण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार पीडित शेतकरी आणि प्लॉटधारकांनी केला आहे.

शेतकर्‍यांच्या जमिनी वर्ग एकमधून वर्ग दोनमध्ये करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीने जिल्हा प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढून महसूल प्रशासनाच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली होती. तरी देखील प्रशासनाने दखल न दिल्यामुळे समितीने राज्य सरकारकडे दाद मागितली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्याच्या महसूल मंत्र्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी व तहसलिदारांचा आदेश रद्द करत असल्याचा आदेश काढला. परंतु जिल्हा प्रशासनाकडून या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात येत नाही. महसूल मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करणार्‍या आदेशाची पायमल्ली होत असल्याने जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीने आक्रमक भूमिका घेत पीडित शेतकरी व प्लॉटधारकांच्या मागण्यांसाठी 27 फेबुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

या उपोषण आंदोलनात जिल्ह्यातील महसूल प्रशासनपीडित शेतकरी व प्लॉटधारकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे पदाधिकारी गावागावात जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. त्यास शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये, असे समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी म्हटले आहहे. आंदोलनात शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर पाटील, सुभाष पवार, रेवणसिद्ध लामतुरे, प्रा.अर्जुन जाधव, अभिजित पवार, संजय पवार, फेरोज पल्ला, उमेश राजेनिंबाळकर, अर्जुन पवार, दिलीप देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी जनजागृती करत आहेत.