चारा टंचाई बाबत तहसीलदारांकडे मागणी नोंदवा !
धाराशिव - यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दीर्घ काळ दडी मारली. यामुळे अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच आता चाऱ्याचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या भागात हा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहे त्यांनी तातडीने आपल्या तहसील कडे चाऱ्याची मागणी नोंदवावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे पिकांची अवस्था बिकट आहे. पिकविम्याची अग्रीम भरपाई मिळवून देण्यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून, जिल्हाधिकारी यांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण करून जिल्ह्यातील 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेश दिले आहेत. इतर मंडळासाठी देखील आपला प्रयत्न सुरु आहे. सध्या विजेची मागणी वाढल्याने पाणी उपलब्ध असले तरी ते देणे अडचणीचे ठरत आहे. यातच आता पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण होत असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या गाव भेटी अभियानातून निदर्शनास येत आहे. काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे चाऱ्यासाठी ऊस तोडावा लागत असल्याचे सांगितले.
आपल्या जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने पशुधनाची संख्या अधिक आहे. तेव्हा अशावेळी हा व्यवसाय कोलमडू नये, यासाठी आपण शासनाकडे आग्रही पाठपुरावा करणार आहोत. पशुपालकांनी चारा तुटवडा निर्माण होत असल्यास तातडीने तहसीलदारांकडे आपली मागणी नोंदवावी. महसूल यंत्रणेच्या माध्यमातून याविषयाची पडताळणी होईल व राज्य शासनास वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला जाईल. या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करून पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गतीने प्रक्रिया करून घेऊ, असेही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.