विमा प्रतिनिधीने पैसे घेऊन केले पीक नुकसानीचे पंचनामे !

उस्मानाबाद तालुक्यात बजाज अलायन्झ पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने मढ्याच्या टाळूवरील लोणी खाल्ले
 
अस्मानी संकटाच्या चिखलात सुलतानी संकटाने लुटले 

उस्मानाबाद  -  अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , कळंब तालुक्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने जिवंत असून तो मेला आहे. याच मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम बजाज अलायन्झ  पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने सुरु केले आहे. 

सर्वत्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत ऑनलाईन व ऑफलाईन देण्याचे बंधनकारक आहे. मात्र खराब वातावरणामुळे नेटवर्क नसल्याने अनेकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात येऊन ऑफलाईन तक्रारी दिल्या.

 या तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात बजाज अलायन्झ पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने जाऊन पंचनामे केले.  पंचनामा करताना त्या प्रतिनिधीने अनेक शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची टक्केवारी जास्ती प्रमाणात दाखविण्यात आली. तर ज्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविली त्यांचे नुकसान झालेले असतानादेखील अगदी अल्प दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्यासह पुन्हा पंचनामे करण्याची मागणी होत आहे. मात्र अतिवृष्टी व पुराच्या तडाख्याने चिखलात माखलेल्या शेतकऱ्यांना लुटून एक प्रकारे मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार संबंधित प्रतिनिधीने केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे संबंधित पीक विमा कंपनीने पंचनामे करावेत यासाठी रीतसर तक्रार अर्ज देखील दाखल केले. मात्र संबंधित पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने कारी येथील शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी पैशाची मागणी केली. काही शेतकऱ्यांनी त्या प्रतिनिधीला रोख व फोन पेद्वारे रक्कम आदा केली. अशांच्या पीक नुकसानीची टक्केवारी जास्ती दाखविण्यात आली आहे. तर ज्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवली अशा शेतकऱ्यांचे १० ते १५ टक्के नुकसान दाखविले आहे. 

एकाच शेतकऱ्याचे वेगवेगळे २ पंचनामे ?

पैशासाठी वाट्टेल ते करणारी मंडळी आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला दिसतात. त्याला विमा कंपनीचे प्रतिनिधी अपवाद कसे असतील ? याचा प्रत्यय अतिवृष्टीने झोडपलेल्या व पुराच्या पाण्याने चिंबून चिखलाने मढलेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी गयावया करुन टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांना आला आहे. कारी येथील शेतकरी  दिलीप सदाशिव हाजगुडे यांच्या गट नं. ९६५ मध्ये असलेल्या सोयाबीनचे तलावाचे पाणी घुसून अतोनात नुकसान झालेले आहे. याचा पंचनामा करताना त्यांनी पैसे दिले नसल्यामुळे पीक नुकसानीची टक्केवारी कमी दाखविली. मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी माझे नुकसान इतके कमी का दाखवले ? असे विचारले असता तुम्ही पैसे द्या टक्केवारी वाढवतो असे सांगितले. त्यांनी पैसे दिल्यानंतर त्याच क्षेत्राचे जास्त नुकसान दाखविले आहे. त्या शेतकऱ्याने ०४०१२७२१००४०१२३०२०५०३ या आयडी क्रमांकावर विमा रक्कम भरलेली आहे. तर यासाठी या प्रतिनिधीने या शेतकर्‍याच्या याच वरील नमूद आयडीच्या नावे पैसे देण्यापूर्वी ००६८७००० व पैसे घेतल्यानंतर ००७२२९२० असे दोन वेगवेगळे पीक नुकसानीचे पंचनामे केले आहेत हे विशेष. असाच प्रकार नितीन पाठक,  परिक्षितराजे विधाते, रामा आटपळकर, संतोष जगदाळे यांच्यासह इतर अनेक शेतकऱ्यांबरोबर झाला आहे.

फोन पेद्वारे केली शेतकऱ्यांची लूट !

शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत असताना त्याला शासकीय मदतीची नितांत आवश्यकता आहे. मात्र शासकीय मदत तर दूरच उलट या आपद्ग्रस्त व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लुटायचे काम पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने केले आहे. पीक नुकसान दाखवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील अशी मागणी केली. शेतकऱ्या जवळ रोकड नसल्यामुळे विमा कंपनीचे प्रतिनिधीने ऑनलाईन खात्यावर पाठवा किंवा फोन पेद्वारे माझ्या खात्यावर पैसे द्या अशी मागणी केली. त्यामुळे नाईलाजास्तव रणजीत विधाते यांनी मुहिब अजिजुर रहेमान यांच्या मोबाईल नं.८८८८५३९४३७ या खात्यावर फोन पेद्वारे २०० रुपये वर्ग केले. त्यामुळे एक प्रकारे मढ्याच्या  टाळुवरचे तेल खाण्याचा प्रकारच या प्रतिनिधीने केल्याचे सिद्ध होत आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल करून पुन्हा नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे. अद्यापही जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. असाच प्रकार जिल्हाभरात झाला असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय कोण व कसा दूर करणार ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.