खरीप 2020 पीक विम्यापोटी आणखीन रु. 119.57 कोटी वितरणास सोमवार पासून सुरुवात

प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम व कांद्याचे अनुदान देखील महिना अखेर मिळणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील
 

धाराशिव -  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनी व . उच्च न्यायालयाकडून प्राप्त रकमेतून खरीप 2020 मधील पिकांच्या नुकसानी पोटी जिल्ह्यातील 3 लाख 53 हजार 824 शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये 119.57 कोटी विमा जमा होण्यास सोमवारपासून सुरुवात होणार असून सततच्या पावसाचे अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. तसेच कांदा अनुदान व नियमित कर्ज परतफेड केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पुरवणी मागण्यात तरतूद करण्यात आली असून, या महिनाअखेर पर्यंत सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

खरीप 2020 मधील नुकसानीपोटी विमा कंपनीने केवळ 79 हजार शेतकऱ्यांनाच रु. 85 कोटी  मंजूर केले होते व यातील देखील केवळ रू. 53 कोटीच प्रत्यक्षात वितरित केले होते. ठाकरे सरकारने याप्रकरणी काहीच कार्यवाही न केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या  हक्काची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केल्यानंतर आजवर एकंदरीत रुपये 375 कोटी प्राप्त झाले आहेत व उर्वरित रकमेसाठी लढा सुरू आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून रु. 201 कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते, त्याचप्रमाणे या दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 597 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु. 3477 प्रमाणे विमा वितरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर विमा कंपनीने पूर्वी मंजूर केलेल्या मात्र वितरित न केलेल्या 20 हजार 227 शेतकऱ्यांना रुपये 19.77 कोटी वितरित करण्यात येत आहेत. ही रक्कम सोमवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

सततच्या पावसाचे अनुदान 
धाराशिव जिल्ह्यासाठी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानी पोटी रु. 137 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. आजवर 123695 शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणित करण्यात आल्या असून यापोटी रु. 97.09 कोटी उपलब्ध करण्यात आले आहेत, तर 83,935 शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. 61.35 कोटी जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणिकरणाचे काम सुरू असून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान वितरित करण्यात येत आहे.

प्रोत्साहनपर अनुदान रक्कम
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने रुपये 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली होती, मात्र अडीच वर्षात सत्तेत राहून देखील सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती. परंतु, महायुती सरकार सत्तेत येताच प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली व आजवर जिल्ह्यातील 45 हजार 728 शेतकऱ्यांना रु. 128.83 कोटी वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांसाठी आवश्यक रकमेची तरतूद पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली असून 31 ऑगस्ट पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

कांदा अनुदान
बाजारातील कांद्याचे भाव अचानक कोसळल्याने महायुती सरकारने शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवत कांद्यासाठी प्रति क्विंटल रु. 350 अनुदान जाहीर केले होते.  पावसाळी अधिवेशनामध्ये यासाठी तरतूद करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात रुपये 550 कोटी वितरित करण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 5852 शेतकऱ्यांना रुपये 22 कोटी 29 लाख रुपये अनुदान या माध्यमातून प्राप्त होणार आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार असून त्यानंतरच्या आठवड्यात प्रत्यक्षात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल.