शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची सूचना 

 

उस्मानाबाद - प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत बळीराजाला नैसर्गिक आपत्तीपासून सक्षम असे संरक्षण देण्याचे काम देशाचे पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांनी  केले आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम राज्य सरकार करत आहे.

केंद्र व राज्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषाप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या निकषानुसार ज्या भागात हंगामा दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ५०% पेक्षा जास्त नुकसान अपेक्षित आहे अशा विमाधारक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५% आगाऊ रक्कम देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद आहे. या रक्कमेमुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला अनुदानासह अधिकचा आर्थिक दिलासा लवकर मिळणार आहे.

कृषी व महसूल यंत्रणा व पिक विमा कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने निकषाप्रमाणे पाहणी करणे, सात दिवसात नुकसानी बाबत आदेश काढणे व पंधरा दिवसात नुकसानीचा अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी पोटी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या निकषाप्रमाणे अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५% अगाऊ रक्कम बाधित विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे जिल्हा कार्यवाहक तथा जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती भाजप आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.