खरीप २०२२ च्या पीक विम्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या बैठक

.- आ. राणाजगजितसिंह पाटील
 

उस्मानाबाद  - प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप २०२२ मधील पीक नुकसानी पोटी रु.२५४ कोटी भारतीय कृषी विमा कंपनीकडुन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. मात्र नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगातुन निष्पन्न झालेल्या नुकसान यापोटी मिळणाऱ्या भरपाईचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने उद्या दि. ०३.१२.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

 सततचा पाऊस व हंगामात उद्भवलेल्या इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसूचना ऑनलाइन पद्धतीने विमा कंपनीला केल्या होत्या. विमा कंपनीकडून या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्यात आली होती. अशा पंचनामे झालेल्या व त्यात नुकसान निष्पन्न झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात आला आहे. काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगातुन निष्पन्न झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे अद्याप बाकी आहे.

 
नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टरी रू. १,००० पासून ते रू. २०,००० पर्यंत एवढी मोठी तफावत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत व मोठे नुकसान असतानाही अत्यल्प विमा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पीक कापणी प्रयोगाची व नुकसान निश्चितिची प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. काढणी पश्चात नुकसानीबाबत देखील अनिश्चितता आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यासोबत चर्चा झाली असून या संबंधित जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक उद्या बोलविण्यात आली असुन शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारींसह बैठकीस उपस्थित राहावे, तसेच पंचनाम्याच्या प्रमाणित प्रति काढण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.