खरीप २०२०  पिक विम्यापोटी  सर्वोच्च न्यायलयात जमा रू. २०१.३४ कोटी चा धनाकर्ष प्राप्त 

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 

उस्मानाबाद  - खरीप २०२० पिक विम्यापोटी  सर्वोच्च न्यायलयात जमा असलेले रू. २०० कोटी व त्यावरी व्याज रू. १ कोटी ३४ लक्ष असा एकूण रू. २०१.३४ कोटी रक्कमेचा धनाकर्ष  जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्या नावे आज प्राप्त झाला आहे.  

 जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी श्री. तिर्थकर मागील आठवडाभर दिल्लीत ठाण मांडून होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे पिक नुकसानीची विमा भरपाई जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वर्ग करण्यात येत आहे. वसूबारसेच्या पुर्वसंध्येला धाराशिवकरांसाठी  ही  आणखीन एक आनंददायी बाब आहे. उद्या हा धनाकर्ष खात्यावर जमा करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न राहणार आहे., असे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

खरीप २०२० मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना जवळपास रू. ५३१ कोटी भरपाई देणे अपेक्षीत आहे. त्यामुळे उर्वरीत आवश्यक रक्कम विमा कंपनी व विमा कंपनीचा केंद्र व राज्य सरकारकडे बाकी असलेला दुसरा हप्ता, यातून प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे खरीप २०२० प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकारचा अंदाजे रु. २०० कोटीचा विमा कंपनीला देय्य दुसरा हप्ता रोखण्यात आला आहे. मा. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने उर्वरीत रक्कमेची तरतुद करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडे दुस-या हप्त्यापोटी बाकी असलेले अंदाजे रू. २०० कोटी  जिल्हाधिकारी यांच्या नियंत्राखाली उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने प्रधान सचिव कृषी यांना विनंती करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी  धाराशिव यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमा कंपनीकडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास मा. सर्वोच्च न्यायालयाला याबाबतची रितसर माहिती देण्याच्या सुचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

याकामी केंद्रीय नेतृत्वासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री,जिल्हाधिकारी यांचे बहूमोल सहकार्य लाभले, त्याबददल आभार. त्याचबरोबरोबर जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी श्री. तिर्थकर यांनी घेतलेल्या मेहनतीबदल त्यांचे देखील विशेष आभार जिल्हावासीयांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. 

कंपनीकडील प्रलंबित 140 कोटी पिकविम्याची नुकसान भरपाई वसूल करावी – खा. ओमराजे निंबाळकर

           खरीप हंगाम 2020 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांनी 2 लाख 95 हजार 237 हेक्टर क्षेत्राकरीता पिकविमा योजनेत सहभाग घेतला होता. सदरील खरीप हंगामात अतिवृष्टी होवून शेतीपिकाचे आतोनात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने SDRF व NDRF मार्फत शेतकऱ्यांना मदत केली होती. मात्र या हंगामात विमा कंपनीने ऑनलाईन तक्रारी शेतकऱ्यांनी वेळेत दिल्या नसल्याने अनेक शेतकरी पिकविम्याच्या नुकसानीपासून वंचित ठेवले होते. 

त्या अनुषंगाने काही पात्र शेतकरी . उच्च न्यायालयात पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी धाव घेतली होती व उच्च न्यायालयाने याचिका मान्य करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई द्यावी असे विमा कंपनीला आदेश दिले होते. त्यानंतर विमा कंपनीने या याचिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील मा. उच्च न्यायालयाचाच आदेश कायम ठेवला व विमा कंपनीला 3 आठवड्यात नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी असे आदेश दिले मात्र विमा कंपनीने आज केवळ 201 कोटींचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असून उर्वरित 330 कोटी व पुर्वीची मंजूर 30 कोटी रक्कम देण्यास विमा कंपनी वेळकाढूपणा करत आहे.

            त्या अनुषंगाने सन 2020 च्या खरीप हंगामापोटी बजाज अलांयन्स इंन्शुरंस कंपनीला  या वर्षीच्या हिस्स्यापोटी देण्यात येणारी 220 कोटी रक्कम विमा कंपनीकडे वर्ग न करता जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे जमा करावी व कंपनीकडे प्रलंबित राहणारी 140 कोटी रक्कम अशी एकुण 360 कोटी बजाज अलायंन्स कंपनीकडून वसूल करावी व जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करावी अशी पत्राद्वारे मागणी कृषि आयुक्त यांच्याकडे केली आहे.