शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 50 हजार रुपयाची मदत करा - आ. कैलास घाडगे - पाटील 

 

उस्मानाबाद - सोयाबीन पिकाला खोडमाशी व चक्री भुंगा किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकाची हानी झाली आहे,सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. अगोदरच्या नुकसानीनंतर पुन्हा हे संकट शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिल्याने यातुन शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पिकास प्रतिहेक्टर 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी , अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.एका बाजुला उत्पादन खर्च पन्नास हजाराच्या पुढे गेला आहे, तर मदत मात्र 13 हजार रुपयाची याने शेतकऱ्यांचा कसा निभाव लागणार असा प्रश्न आमदार घाडगे पाटील यानी विचारला आहे.  


धाराशिव-कळंब पाऊस चांगला झाल्याने सूरुवातीला शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता.शेतकऱ्यांचा कल नगदी पिक असलेल्या सोयाबीन पिकाकडे असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांनी वेळेत शेतीच्या मशागतीची कामे करुन खत-बियाणांची खरेदी करुन खरीप हंगामाची पेरणी पुर्ण केली.जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीस सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाय,किड अळींचा प्रादुर्भाव होवून हजारो हेक्टरवरील पिक उध्द्वस्त झाले.अशातच यलो मोझॅक या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सोयाबीन पिक हे पिवळे पडून हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण महसुल मंडळातील सुर्डी, बेगडा, पिंपरी, पोहनेर, गावसुद आणि वरवंटीसह काही गावांचा जिल्हा कृषि अधिकारी व किटकशास्त्रज्ञ कृषिविज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्यासोबत पाहणी दौरा केल्यानंतर सोयाबीन पिक हे हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्षात खोडमाशी व चक्री भुंगा किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाना फळधारणा नाही.हे चक्री भुंगा व खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाच्या झाडाच्या खोडामधून झाला असुन वरकरणी सोयाबीन पिक हे हिरवेगार दिसत असले तरी फळधारणा नसल्याने हजारो हेक्टरमधील सोयाबीन पिक हे संपुर्णत: वाया गेले असेही आमदार घाडगे पाटीलानी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे शुन्य असुन अनेक महसुल मंडळामध्ये तशा तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्याचे आमदारानी सांगितले.येत्या काही दिवसांमध्ये चक्री भुंगा व खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास बाधीत क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना शासनाकडून नैसर्गिक आपत्ती निवारण्याकरीता देण्यात येणारी 13 हजार 600 रुपये ही मदत तुटपुंजी आहे.ही शेतकऱ्यांना आज रोजीच्या केलेल्या खर्चापेक्षा कमी असून प्रति एकरी येणारा खर्च आमदार पाटील यानी दाखविला आहे.

नांगरणी 2000, पंजी / नांगरट मोडणी (2 पाळी) 1600, कुळवणी (2 पाळी) 1600, पेरणी 900, खत (50 किग्रॅ/ बॅग) 1485, सोयाबीन बियाणे 4000, तणनाशक फवारणी 1600, कोळपणी 1000, किटक नाशक फवारणी (5) 5000, इतर मजुरी 1000, एकुण प्रतिएकरी येणारा खर्च 20185 (1 हेक्टर = 2.5 एकर म्हणुन 2.5 X 20185 = 50462)त्या अनुषंगाने प्रतिहेक्टरसाठी येणारा एकुण खर्च 50 हजार 462 शासनाच्या जाहिर केलेल्या मदतीनुसार प्रति हेक्टरी केवळ 13,600 एवढी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. आसमानी व सुलतानी संकटे अंगावर घेवून जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे त्रस्त आहे.या परिस्थितीत शासनाच्या मदतीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता किमान 50 हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघात नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईबाबत भरीव आर्थिक मदत देण्याकरीता झालेल्या नुकसान भरपाईचा सहानुभुतीपुर्वक विचार होवून प्रतिहेक्टरी 50 हजार एवढी मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.