खुशखबर : सन २०२० च्या पीक विम्याचे उद्यापासून वाटप
उस्मानाबाद - सन २०२० च्या पीक विम्यांचे २०१ कोटी रूपये उद्यापासून वाटप केले जाणार असून , पीक विम्याचा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून हेक्टरी ६६३९ मिळणार आहेत. उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त झाल्यावर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सन २०२० च्या पीक विम्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आव्हान देताना बजाज अलायन्स कंपनीने २०० कोटी रुपये जमा केले होते. सुप्रीम कोर्टातील ही रक्कम व्याजासह अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर २०१.३४ जमा झाली असून, याच रक्कमेचे उद्यापासून वाटप करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 पीकविमा यादीतील पात्र शेतकऱ्यांची संख्या 169086 वरून 353499 एवढी म्हणजेच 184413 वाढली आहे. सोयाबीन पिकाचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी विमा मिळालेले शेतकरी वगळता अन्य यादीनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रू.18000 प्रमाणे क्षेत्रनिहाय हिश्याचा पहिला हफ्ता प्रति हेक्टरी रु.6639 प्रमाणे उद्या पासून पुढील दोन दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागूनही मुजोर बजाज अलायन्स कंपनीने संपूर्ण रक्कम दिलेली नाही, त्यामुळे या कंपनीही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, उपलब्ध असलेल्या २०१ कोटीचे वाटप विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी रु.6639 प्रमाणे देण्यात येणार आहे.
पीक विमा शेतकऱ्यांची यादी पाहा ... येथे क्लिक करा
आपल्या लढ्यातील हे पहिले यश असल्याची प्रतिक्रिया आ. कैलास पाटील यांनी व्यक्त केली तर आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारची अवमान याचिका दाखल
सन २०२० ची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देऊनही बजाज अलायन्स कंपनीने अद्याप संपूर्ण रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केल्याचे आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.