अत्यल्प नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांनी पंचनामाच्या प्रमाणित प्रती काढून घ्याव्यात
उस्मानाबाद - खरीप २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी भारतीय कृषी विमा कंपनीने काल व आज मिळून पहिल्या टप्प्यातील रु. २५४ कोटी नुकसान भरपाई वितरित केली आहे. परंतु नुकसान भरपाई च्या रकमेतील तफावतीबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेकांना नुकसानीच्या प्रमाणात अत्यल्प विमा मिळाला आहे. सदरील पीक विमा हा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी पोटी देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ऑनलाइन सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या, त्या सूचनांच्या अनुषंगाने करण्यात आलेले पंचनामे व यामध्ये दाखविण्यात आलेले नुकसान याप्रमाणे विमा वितरित करण्यात आला आहे.
पुढील टप्प्यात काढणी पश्चात नुकसानीच्या प्राप्त सूचनांचा अनुषंगाने झालेले पंचनामे व पीक कापणी प्रयोग यातून निष्पन्न झालेल्या नुकसानी पोटी अनुज्ञेय विमा वितरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात अत्यल्प विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करून पंचनाम्याच्या प्रमाणीत प्रती काढून घ्याव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या समक्ष पंचनामे करून त्यावर त्यांची स्वाक्षरी अपेक्षित आहे. क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी एकसारखीच असतानाही बाधित क्षेत्र कमी जास्त दाखवल्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमे मध्ये तफावतीची प्रकरणे समोर आली आहेत. अगदी रु. १५०० प्रति हेक्टरी पासून रु १७००० प्रति हेक्टरी पर्यंत नुकसान भरपाई रकमे मध्ये तफावत आहे. काढणी पश्चात नुकसानीच्या ऑनलाइन सूचना केलेल्या शेतकऱ्यांना या टप्प्यात नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली नाही तसेच पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या नुकसानी पोटी अनुद्येय पीक विम्याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरात लवकर ही नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.