भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

- अभिमन्यू काशीद

 

उस्मानाबाद - दि.04 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-23 करीता राबविण्यास शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.

          भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत लाभार्थी निवडीची प्रक्रीया महाडीबीटी या प्रणालीव्दारे राबविण्याचे निर्देशित केल्यामुळे महाडीबीटी प्रणाली सुरू झाल्यापासून योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी मागील प्राप्त अर्ज आणि दि.30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणारे अर्ज यांची एकत्रित लॉटरी महाडीबीटीव्दारे केली जाईल. या योजनेमध्ये पुढील लाभार्थ्यांना अर्ज करता येतील.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरीता पात्र ठरू शकत नाहीत असे शेतकरी. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याच्या स्वत: च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे. यापुर्वी महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड केली जाईल. या योजनेअंतर्गत किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकेल. या योजनेमध्ये आंबा कलमे, रोपे, पेरू कलमे, डाळींब कलमे, कागदी लिंबु कलमे किंवा रोपे, मोसंबी कलमे, संत्रा कलमे, नारळ रोपे, सिताफळ कलमे किंवा रोपे, आवळा कलमे किंवा रोपे, चिंच कलमे किंवा रोपे, जांभूळ कलमे किंवा रोपे, अंजिर कलमे किंवा रोपे, चिकु कलमे किंवा रोपे या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर जावून जास्तीत जास्त अर्ज दि.30 नोव्हेंबर 2022 पुर्वी करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.