शेतजमिनीचे विभाजन आणि शेतरस्ते खुला करण्यासाठी विशेष मोहिम

उस्मानाबाद तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा प्रशासनाचे आवाहन
 

उस्मानाबाद -    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 85 व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 मधील तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्यावरून किंवा सहधारकांनी अर्ज केल्यानंतर, जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम, 1947 तरतुदींना अधीन राहून धारण जमिनीचे विभाजन करण्याची पध्दत विषद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी जिल्ह्यामध्ये शेतजमिनीच्या विभाजनासाठी आणि शेतरस्ते खुला करणे तसेच नवीन शेतरस्ता मंजुर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये विशेष मोहिम राबविण्याचे योजिले आहे.

         त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यामध्ये महूसल मंडळातील तलाठी सजा निहाय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद शहरातील उस्मानाबाद सज्जा दि.23 जानेवारी 2023 रोजी आणि सांजा सज्जा दि.24 जानेवारी 2023 रोजी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.

          मेडसिंगा आणि बेंबळी सज्जा दि.25 जानेवारी, देवळाली आणि आंबेवाडी सज्जा दि.27 जानेवारी, वडगांव (सि.) आणि कनगरा सज्जा दि.28 जानेवारी, पोहनेर आणि महालिंगी सज्जा दि.30 जानेवारी, चिलवडी आणि टाकळी बेंबळी सज्जा दि.31 जानेवारी 2023 रोजी कॅम्प आयोजित केले जाणार आहेत.

         अंबेजवळगा, येडशी, पाडोळी (आ) आणि जागजी सज्जा दि.01 फेब्रुवारी, कौडगाव, दुधगाव, सारोळा (बु.) आणि भिकारसारोळा  सज्जा दि.02 फेब्रुवारी, घाटंग्री, खेड, चिखली आणि सुभा सज्जा दि.03 फेब्रुवारी, शिंगोली, उपळा (मा.), समुद्रवाणी आणि टाकळी ढोकी सज्जा दि.04 फेब्रुवारी, जुनोनी, आळणी, नितळी आणि इर्ला सज्जा दि.06 फेब्रुवारी, रुई ढोकी, कामेगाव आणि कोंड सज्जा दि.07 फेब्रुवारी 2023 रोजी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.

       करजखेडा, केशेगाव, ढोकी आणि तेर सज्जा दि.08 फेब्रुवारी, पाटोदा, धारुर, गोवर्धनवाडी आणि हिंगळजवाडी सज्जा दि.09 फेब्रुवारी, ताकविकी, बामणी, कोलेगाव आणि कोळेवाडी सज्जा दि.10 फेब्रुवारी, भंडारी, बावी, पळसप आणि किणी सज्जा दि.11 फेब्रुवारी, विठ्ठलवाडी, रुईभर, कसबे तडवळा आणि काजळा सज्जा दि.13 फेब्रुवारी आणि कोंबडवाडी तसेच वाघोली सज्जा दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी कॅम्प आयोजित केले जाणार आहेत.

                 उस्मानाबाद तालुक्यातील सर्व नागरिकांनी धारण जमिनीचे विभाजन सहमतीने सहधारकामध्ये विभाजन करणे तसेच शेतरस्ते खुले करणे आणि नवीन शेतरस्ते मागणीसाठी वरील प्रमाणे दर्शविल्यानुसार संबंधीत सज्जामध्ये विशेष मोहिमे अंतर्गत कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. कॅम्पच्या दिवशी आपल्या तलाठी कार्यालयामध्ये हजर राहून संबंधीत खातेदार, नागरिकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आपल्या तलाठी यांच्याकडे सादर करावेत. सदरील विषयाशी संबंधीत आवश्यक नमुने आपल्याशी संबंधीत मंडळ अधिकारी किंवा तलाठी कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार गणेश माळी यांनी केले आहे.