अतिवृष्टीचा फटका : उस्मानाबाद जिल्ह्यात २४० कोटीचे नुकसान
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार २३९ कोटी ९८ लाख ६८ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
दि.२७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख ८८ हजार १३७ शेतकऱ्यांच्या २ लाख ६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. तर मयत व्यक्ती, दुधाळ, मोठी व लहान जनावरे यांचा मृत्यू, सार्वजनिक रस्ते उखडणे, पूल नादुरुस्त होणे, तलाव फुटणे, महावितरणच्या पायाभूत सुविधांची नासधूस होणे, मोठे व लहान ओढकाम व अंशतः घराची पडझड आदी दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार २३९ कोटी ९८ लाख ६८ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून पंचनामे सुरू असल्यामुळे या नुकसानीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे या उद्भवलेल्या पूर परिस्थितीत २ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर ९३ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच दुधाळ मोठे व लहान अशी ११० जनावरे दगावली असून त्यापोटी ते ३३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून लहान-मोठे ओढकाम करणारी ४ त्यापोटी ८० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. तर १ हजार ८७ कच्चा व पक्क्या घरांची पडझड झाली असून त्यापोटी ६५ लाख २२ हजाराची नुकसान झाली आहे.
तसेच शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, तूर, उडीद, कांदा, मका, ऊस व इतर फळबागां या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात व अतोनात नुकसान झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या १४६ कोटी ३५ लाख ४६ हजार २०० रुपयांचे शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत असलेले ८२.१० कि.मी. व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेले ५१.८० कि.मी. असे १३३ ९० कि.मी. रस्ते नादुरुस्त झाले आहेत. यापोटी अनुक्रमे २२ कोटी ४९ लाख रुपये व २९ कोटी २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेले ४४ व जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत असलेले ६५ पूल नादुरुस्त झाले असून त्यापोटी अनुक्रमे २९ कोटी ६१ लाख व ९ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत असलेल्या पाझर तलावातपैकी ५ तलाव फुटले असून त्यापोटी ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.